अमेरिकेचाच होणार सर्वाधिक खर्च
#लंडन
ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांचा ६ मे रोजी वेस्ट मिनिस्टर ॲबे येथे राज्याभिषेक होत असून त्याची तयारी जोरदारपणे सुरू आहे. या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी अमेरिकेचे नागरिक मोठ्या संख्येने येणार असून त्यामुळे येथील पर्यटनाबरोबर हॉटेल, पयर्टन व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत. या राज्याभिषेकास हजर राहणाऱ्यांच्या आदरातिथ्यासाठी लंडनमधील मोठी हॉटेल झटून कामाला लागली आहेत.
हॉटेल बुकिंग करणाऱ्या एका ॲलोरा एआय संस्थेने केलेल्या अभ्यास अहवालातील निष्कर्षानुसार ब्रिटनमधील फोर आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जे लोक राहावयास येणार आहेत, त्यात अमेरिकी लोकांचा वाटा हा ३२ टक्के एवढा असेल. वर्षाच्या या काळात जेवढा खर्च अमेरिकी लोक करतात त्यापेक्षा ही टक्केवारी कितीतरी अधिक आहे. सर्वसाधारणपणे अमेरिकी लोक २४ टक्के खर्च करतात, तर देशांतर्गत प्रवास करणारे ३४ टक्के खर्च करतात.
ब्रिटनच्या राजेशाहीपासून अमेरिकेने १७७६ मध्येच आपले नाते तोडले होते. मात्र, अमेरिकी नागरिकांना ब्रिटनबद्दल असलेली ओढ काही कमी झालेली नाही. संस्थेने केलेल्या पाहणीनुसार राजे चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेकाने अमेरिकी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून त्याचा फायदा लंडनमधील पंचतारांकित हॉटलना होणार आहे. कारण, कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांपैकी अमेरिकी लोक सर्वाधिक पैसा खर्च करणार असून तोही जास्तीतजास्त हॉटेलवर होणार आहे. अमेरिकी नागरिकांचा खर्च हा ब्रिटनमधील नागरिकांच्या खर्चापेक्षा कितीतरी अधिक असणार आहे.
आता लंडनमधील अनेक पंचतारांकित हॉटेलनी आपल्या आदरातिथ्यांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण नावीन्य आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामध्ये राज्याभिषेक कल्पनेवर आधारित हाय टी, कॉकटेलपासून मिचेलीन स्टार डीनरचा समावेश आहे. तसेच या कार्यक्रमास हजर राहणाऱ्यांना वैशिष्ट्यपूर्ण व्हिस्कीही उपलब्ध करून दिली जाणार असून त्याची किमत २५ हजार पौडांपर्यंत असेल असे सांगितले जाते. लंडनर या पंचतारांकित हॉटेलने पॉप अप रॉयल मार्टिनी बार सुरू केला असून या पावलावर पाऊल टाकून अनेकजण प्रत्येकाला आकर्षित करण्यासाठी विविध कल्पना राबवत आहेत. लंडनमधील सर्व हॉटेल या राज्याभिषेकाचा वापर करून धंदा कसा वाढवायचा यावर विचार करत आहेत. डॉर्चेस्टर या हॉटेलने तर या काळात आपल्या पाहुण्यांसाठी रूफटॉपवर मेजवानीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. थ्री कोर्स लंचचा आस्वाद घेत तुम्ही रेड ॲरोचा अनुभव घेऊ शकाल. त्यासाठी तुम्हाला लंचसाठी
प्रतिव्यक्ती केवळ १६५ पौड म्हणजे २०५ डॉलर मोजावे लागतील.
व्हीजिट ब्रिटन या राष्ट्रीय पर्यटन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रीसिया येट्स या म्हणतात की, राज्याभिषेक कार्यक्रमाचे जगभर आकर्षण असून प्रामुख्याने अमेरिकी नागरिक त्याला मोठ्या संख्येने हजेरी लावतील. त्यामुळे कोराेनाच्या दोन वर्षांत मार खाल्लेल्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळणार आहे. २०१९ मध्ये अमेरिकी नागरिकांनी सव्वा पाच अब्ज पौंड ब्रिटनमध्ये खर्च केले होते. त्याच्या तुलनेत आतापर्यंत अमेरिकी नागरिकांनी ४० टक्क्यांहून अधिक रक्कम खर्च केली आहे.
वृत्तसंस्था