चीनच्या सीमेवर अमेरिकेच्या सुपरसॉनिकचा गजर
#पेंटागॉन
भीतीदायक आवाजासारखाच शत्रू देशातील शहरांवर अचूक मारा करत नायनाट करण्याची क्षमता असणाऱ्या 'बी-१ बी सुपरसॉनिक बॉम्बर' विमानांची एक पलटण भारतात दाखल झाली असून ही विमाने आता चीनच्या सीमेवर आपला गजर करणार आहेत.
अमेरिकेच्या संरक्षण दलाच्या ताफ्यातील सर्वाधिक घातक लढाऊ विमानांत गणना होणाऱ्या या विमानांची पलटण बंगळुरू येथील लष्कराच्या तळावर दाखल झाली आहे. 'कोप इंडिया-२३' या भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त लष्करी सरावासाठी अमेरिकेने विविध प्रकारची लढाऊ विमाने भारतात पाठवली आहेत. भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून अवघ्या ७०० किलोमीटर अंतरावर अमेरिका आपले आकाशातील युद्धकौशल्य दाखवणार आहे. पश्चिम बंगालच्या कलायकुंडा हवाईतळावर हा सराव केला जाणार आहे. सहसा अमेरिका 'बी-१ बी सुपरसॉनिक बॉम्बर विमानाचा समावेश कुठल्याच युद्धसरावात करत नाही. मात्र चीनच्या विस्तारवादी धोरणांना जरब घालण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.वृत्तसंस्था