अमेरिकेचे बँकिंग क्षेत्र बुडण्याच्या मार्गावर?
#न्यूयॉर्क
अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बंद पडल्याचे वृत्त समोर आले आणि मग अमेरिकेतील सार्वजनिक बँकिंग क्षेत्र प्रकाशझोतात आले. केवळ अमेरिकाच नव्हे तर युरोपमधील बहुतांश बँकांची अवस्थाही नाजूक आहे. खातेदार छोट्या बँकांतून आपले पैसे काढत मोठ्या बँकात ठेवत आहेत. स्वित्झर्लंडची प्रमुख बँक क्रेडिट सुइससुद्धा दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. एका अहवालानुसार अमेरिकेतील आणखी १८६ बँका बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
'सोशल सायन्स अँड रीसर्च नेटवर्क' या थिंक टॅन्कच्या अहवालानुसार अमेरिकेतील बँकांच्या घसरणीची ही केवळ सुरुवात आहे. आणखी १८६ बँका बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. व्याजदरवाढ आणि कुठल्याही हमीव्यतिरिक्तची खातेदारांची संख्या ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ज्या वेगाने सिलिकॉन बँक बुडाली तो वेग पाहता इतर बँका या आर्थिक संकटाला सामोरे जाऊ शकतील, अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
कधी झाली बँका बुडायला सुरुवात ?
सिलिकॉन व्हॅली बुडाल्यावर अमेरिकेतील सर्वसामान्य खातेदार मोठ्या प्रमाणात आपले पैसे काढून घेत आहेत. २००१ पासून २०२३ पर्यंत अमेरिकेतील ५६० बँका बुडाल्या आहेत. २००२ साली चार बँका दिवाळखोर झाल्या होत्या. २००२ साली १० बँकांना आपला गाशा गुंडाळावा लागला होता. २००३ आणि २००४ साली प्रत्येकी ४ बँकांचे दिवाळी निघाले. २००८ साली २५ बँकांचे दिवाळी निघाले होते. यात वॉशिंग्टन म्युच्युएल या ३०७ अब्ज डॉलरची मालमत्ता असलेल्या मोठ्या बँकेचा समावेश होता. ३२ अब्ज डॉलर मालमत्तेची इंडिमॅक बँकही बंद पडली. २००९ या एकाच वर्षात १४० बँकांचे दिवाळे वाजले आहे. २०१० साली १५७ बँकांचे दिवाळी निघाले होते. हा एकाच वर्षात जास्तीत जास्त बँका दिवाळखोर होण्याचा सर्वाधिक आकडा ठरला. २०११ साली ९२ बँकांचे दिवाळे निघाले. २०१२ साली ५१ बँका मोडित काढण्यात आल्या. २०१३ साली २४ बँकांचे दिवाळे निघाले. २०१४ साली १७ बँकांना आपला अवतार संपवावा लागला. यानंतरच्या काळात दिवाळखोरीत निघणाऱ्या बँकांची संख्या घटत गेली. यापूर्वी २००८ साली २५ बँका बुडाल्या होत्या. या वर्षी त्या तुलनेत केवळ दोनच बँक दिवाळखोरीत निघाल्या आहेत, मात्र चर्चा अधिक होत आहे.वृत्तसंस्था