अमेरिकेने घेतली ‘एआय’ची धास्ती
#न्यूयॉर्क
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबद्दल (एआय) चिंता व्यक्त केली आहे. हे तंत्रज्ञान मानवी समूहाच्या कल्याणासाठी घातक ठरू शकते. तंत्रज्ञानाचा गैरवापर समाजासाठी धोकादायक ठरू शकतो. भविष्यात एआयसारखे तंत्रज्ञान समाजाला कसे प्रभावित करणार आहे, ही जशी उत्सुकतेची तशीच चिंतेची गोष्ट असल्याचेही बायडेन यांनी नमूद केले आहे. दरम्यान यापूर्वी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलॉन मस्क आणि ऍप्पलच्या सह-संस्थापकांनी एआयबद्दल चिंता व्यक्त केली होती. मस्क यांनी तर या तंत्रज्ञानाचा विकास थांबवण्याचा इशाराही दिला आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील अध्यक्षांच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी बायडेन म्हणाले की, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील ही नवी उत्पादने सर्वसामान्य लोकांसाठी बाजारात उपलब्ध करून देण्यापूर्वी मानवी समूहासाठी सुरक्षित आहेत का, याची खात्री करणे गरजेचे आहे. ही तंत्रज्ञान कंपन्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. एआय धोकादायक आहे का, अशी विचारणा केल्यावर बायडेन यांनी, ते तपासून पहावे लागणार आहे, असे त्रोटक उत्तर दिले, मात्र या उत्पादनांच्या बाजारातील आगमनाबाबत आपण साशंक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आजार आणि हवामान बदल यासारख्या आव्हानांना तोंड देणे शक्य होणार आहे. मात्र असे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्यांनी आपल्या समाजासाठी, आपल्या अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी संभाव्य जोखीम निर्माण होणार आहे का ते तपासणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम हे दर्शवतो की, सुरक्षिततेची उपाययोजना न केल्यास नवीन तंत्रज्ञानामुळे नुकसान होऊ शकते.
जगभरातील तंत्रज्ञान अभ्यासकांतही एकमत
दरम्यान सध्या जगभरात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. सोशल मिडीयाच्या वापरानंतर तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणामही समोर आले आहेत. गुन्हेगारीचे नाव-नवे प्रकार समोर येत आहेत. या विविध घटना तंत्रज्ञानाच्या गैरवापराच्या द्योतक आहेत. सुरक्षिततेची उपाययोजना न केल्यास नवीन तंत्रज्ञानामुळे नुकसान होऊ शकत असल्याचे हे पुरावे आहेत. एआयचे नियमन कसे करावे याबद्दल सध्या वादविवाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बायडेन यांची टिपण्णी समोर आली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी सुरक्षा उपाय लागू होईपर्यंत एआय तंत्रज्ञानाचा विकास थांबवण्याचे आवाहन केले आहे.
मानवी बुद्धीमत्तेला पर्याय म्हणून विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे समाज आणि मानवतेसमोर नवी आव्हाने उभी रहाणार असतील तर असे संशोधन करण्यात काहीच अर्थ नसल्याची भावना तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या तंत्रज्ञानाचा वापर शक्य तेवढा सकारात्मक होईल आणि त्याचे नियमन करता येईल, याची शाश्वती असेल तरच एआय तंत्रज्ञानाचे पुढचे संशोधन करण्यात यावे, असा आग्रह सर्वत्र धरला जात आहे.