न्यूयॉर्कमध्ये हवा प्रदूषणाचा उच्चांक
#न्यूयॉर्क
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात हवा प्रदूषणाची समस्या अगदी गंभीर झाली आहे. बुधवारी (७ जून) शहरात प्रदूषणामुळे चक्क आभाळाचा रंगही केशरी झाला होता. यामुळे शहरातील नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले होते. कॅनडामधील वणव्यांमुळे हे घडले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागाने न्यूयॉर्क शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत एक स्वतंत्र नियमावली जारी केली आहे. यामध्ये नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे आणि श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक खबरदारी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.
राष्ट्रीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील हवेत राखेचे कण आढळून आले. वणव्यातील धुरामध्ये असणारे हे कण या ठिकाणी आढळून आल्यामुळे, हे प्रदूषण कॅनडातील वणव्यांमुळे झाले असल्याचे म्हटले जात आहे. बुधवारी न्यूयॉर्क जगातील सर्वात प्रदूषित शहर होते.
हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार न्यूयॉर्कमधील हवामानाची पातळी ३५०-ए एवढी होती. ही पातळी अत्यंत धोकादायक मानली जाते. न्यूयॉर्कमध्ये यापूर्वी कधीही एवढ्या प्रमाणात हवा प्रदूषित झाल्याची नोंद झालेली नाही. न्यूयॉर्कमध्ये प्रदूषणामुळे दाट धुक्याचा थर जमा झाला होता. यामुळे राष्ट्रांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय रेल्वे आणि रस्ते वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. समोरचे दिसत नसल्याने महामार्गावरही वाहनांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
न्यूयॉर्क राज्य प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. या प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, नाक आणि घशाचा त्रास, खोकला, शिंका, सर्दी आणि श्वास घेण्यास अडचण अशा तक्रारी जाणवू शकतील, असे यात म्हटले आहे. यासोबतच शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी नागरिकांना शक्य तितके घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
१३ राज्यांमध्ये प्रदूषण नियंत्रणाची सूचना
कॅनडामध्ये सध्या ४०० पेक्षा अधिक वणवे पेटले आहेत. याचा गंभीर परिणाम अमेरिकेवर होत आहे. दाट धुक्याची ही चादर दक्षिण दिशेला वेगाने प्रवास करत आहे. त्यामुळे अमेरिकेतील १३ राज्यांना हवा प्रदूषणाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील आतापर्यंतचा हा सर्वात गंभीर वणवा आहे. आतापर्यंत तब्बल ६.७ दशलक्ष एकर जंगलामध्ये हा वणवा पसरला आहे.