एआय म्हणजे 'अमेरिका अँड इंडिया'
#वॉशिंग्टन
अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी एक खास टी- शर्ट भेट दिला आहे. या टी- शर्टवर एक खास संदेश लिहिला आहे. बायडन यांनी मोदींना दिलेल्या या टी-शर्टची आणि त्यावर लिहिलेल्या संदेशाची जोरदार चर्चा सुरू आहे.
अमेरिका दौऱ्यात मोदींनी मोठ्या उद्योगपतींबरोबर घेतली. यावेळी बायडनही उपस्थित होते. त्याचवेळी बायडन यांनी मोदींना हा खास लाल टी-शर्ट भेट दिला. बायडन यांनी नरेंद्र मोदींना टी शर्ट भेट दिल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या टी-शर्टवर लिहिले आहे, एआय म्हणजेच भविष्य आहे, 'अमेरिका अँड इंडिया' .
सध्या विविध क्षेत्रात 'एआय' अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बोलबाला आहे. त्यामुळे भविष्यात 'एआय'चा वापर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र यातील संक्षिप्त अक्षरांचा वापर केलेला टी -शर्ट बायडन यांनी मोदींना दिला आहे.
मोदींनीही बायडन टी- शर्ट देतानाचा फोटो शेअर करत म्हटले आहे, 'कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा भारत-अमेरिका, भविष्य 'एआय'चेच आहे. जेव्हा आम्ही एकत्रित काम करतो, तेव्हा दोन्ही राष्ट्र मजबूत होतात. ही दोन राष्ट्र एकत्र काम करतात तेव्हा पृथ्वीलाही फायदा होतो.
बायडन यांच्या उपस्थितीत उद्योगपतींबरोबर झालेल्या बैठकीत अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कूक, मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्या नडेला, रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी, महिंद्रा समुहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांच्यासह अनेक लोक सहभागी झाले होते.
वृत्तसंस्था