सुरक्षा समितीतील नकाराधिकाराचे उच्चाटन करा
#संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या सगळ्याच कायमस्वरूपी सदस्य देशांना नकाराधिकार द्या अथवा नकाराधिकाराचे उच्चाटन करा, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्राच्या कार्यपद्धतीत बदलाचा आग्रह धरला आहे. सुरक्षा समितीत समता प्रस्थापित झाल्याखेरीज जागतिक पेचप्रसंगावर मात करण्यात संयुक्त राष्ट्रसंघाला कदापि यश मिळणार नसल्याचा इशाराही भारतातर्फे देण्यात आला आहे.
एक तर सुरक्षा समितीतील सगळ्या सदस्यांनाचा मताधिकार द्या अन्यथा ही विशेषाधिकाराची पद्धतच बंद करा, असा आग्रह भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील प्रतिनिधी प्रतीक माथूर यांनी बुधवारी (२६ एप्रिल) आमसभेत धरला आहे. मागच्या वर्षी झालेल्या आमसभेत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीच्या कार्यपद्धतीतील संभाव्य बदलाची चर्चा झाली होती, त्याचा दाखला देत माथूर यांनी, आता चर्चेनुसार प्रत्यक्ष निर्णयाची गरज असल्याचा आग्रह लावून धरला. जोपर्यंत सुरक्षा समितीत कायम सदस्यत्व देण्यात आलेल्या इतर देशांना मतदानाचा अधिकार देण्यात येत नाही, तोवर कार्यपद्धतीमधील बदलांच्या चर्चा कागदोपत्रीच राहतील. सुरक्षा समितीच्या विस्तारालाही काहीच अर्थ उरणार नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन देशांमधील वाद सोडवण्यासाठी सुरक्षा समितीमधल्या सर्व सदस्यांना मतदानाचा अधिकार देणे अनिवार्य आहे. अन्यथा सुरक्षा समितीच्या विस्तारालाही काहीच अर्थ राहणार नाही. सुरक्षा समितीचा विस्तार केवळ देखावा ठरेल, अशा शब्दांत माथूर यांनी आपली मागणी अधोरेखित केली आहे.
वृत्तसंस्था