झेब्रा पाळला अन हात गमावला
#ओहियो
लोक काय वाटेल ते प्राणी पाळत असतात. भारतात जसे गायी-म्हशी, घोडे पाळतात तसे अमेरिकेत डुक्कर, हरीण, ससे, कुत्रे, मांजरी पाळतात.ओहियोच्या एका बहाद्दराने तर घरात झेब्रा पाळला होता. मात्र झेब्रा पाळणे त्याला एवढे महागात पडले की त्याला त्याचा एक हात गमवावा लागला आणि पोलिसांनी वेळीच मदत केली म्हणून तो वाचू शकला.
सोशल मीडियावरील व्हीडीओत आपण बघतो की, लोक वाघ, सिंह, रानडुक्कर इतकेच काय अजगरही पाळतात. मात्र ओहियो प्रांतातील पीकअवे काऊंटी येथील एका ज्येष्ठ नागरिकाने (वय ७२ वर्षे) त्याच्या शेतात एक झेब्रा पाळला होता. १२ मार्च रोजी त्याच्या या पाळीव झेब्राने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात हा नागरिक इतका जायबंदी झाला की त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. १२ मार्चला सायंकाळी पाचच्या सुमारास पीकअवे काऊंटीच्या नगरपालांच्या कार्यलयात फोन आला. या फोन करणाऱ्या व्यक्तीने तत्काळ मदतीची मागणी केली. एका ज्येष्ठ नागरिकांवर झेब्राने हल्ला केला असून त्याला मदत पाठवण्यात यावी, असे सांगितले गेले.
पोलिसांनी एक रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली, तिथे त्यांना एक ज्येष्ठ व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले आणि झेब्रा आक्रमणाच्या पवित्र्यात उभा असलेला दिसला. त्या जखमी व्यक्तीचा हात शेजारीच पडला होता. ही व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडून होती. पोलिसांनी सर्वप्रथम त्या ज्येष्ठ नागरिकाला रुग्णवाहिकेत घातले आणि उपचारासाठी पाठवले. त्यादरम्यान हा झेब्रा युद्धाच्या पावित्र्यात होता. त्याला शांत करणे अशक्य असल्यामुळे पोलिसांनी त्याला गोळी घातली.
झेब्रा रागात आला की त्याला नियंत्रणात आणणे कठीण असते. विशेष म्हणजे झेब्राला संघर्षात समोरच्या व्यक्तीने पाठ दाखवली की त्याला आणखी चेव चढतो, असे मानले जाते. मालकाचा हात जायबंदी करून ब्रेक घेतलेल्या झेब्राने पुढच्या हल्ल्याची तयारी केली होती. त्यावेळी दोन पोलिसांनी तिथे प्रवेश केला आणि त्या नागरिकाला तिथून हलवले. त्यामुळे संतापलेल्या झेब्राने या दोघांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. अखेर गळी झाडून त्याला ठार करावे लागले.
वृत्तसंस्था