युक्रेनच्या विरोधात संतापाची लाट
#कीव
पाकिस्तानला शस्त्रे पुरवणाऱ्या युक्रेनच्या आणखी एका चुकीच्या कृतीमुळे भारतीय नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. नुकतेच युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने एक फोटो ट्विट केला असून त्यामुळे भारतीयांचा संताप अनावर झाला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कालीमातेचा आक्षेपार्ह फोटो शेअर करण्यात आला आहे. भारतातील ट्विटर वापरकर्त्यांकडून याबद्दल संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यासोबतच नेटकऱ्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे पत्राद्वारे कारवाई करण्याची मागणी केली आहे.
युक्रेन सरकारने हेतुतः भारतीयांना श्रद्धास्थानी असलेल्या कालीमातेचे आक्षेपार्ह छायाचित्र ट्विटरवरून प्रसारित केले असल्याची तक्रार जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे. भारत सरकारने त्वरित युक्रेन सरकारकडे याबाबत खुलासा मागावा आणि दिलगिरी व्यक्त करायला भाग पाडावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या @DefenceU या अधिकृत ट्विटर हँडलने ३० एप्रिलला ट्विट केलेला फोटो 'वर्क ऑफ आर्ट' या कॅप्शनसह शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये कालीमातेची प्रतिमा ही हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मन्रोच्या पोजमध्ये दाखवण्यात आली आहे. स्फोटातून निघालेल्या धुरात कालीमातेचा चेहरा मर्लिन मन्रोसारखा दिसत आहे. तिची जीभ बाहेर आहे आणि तिच्या गळ्यात कवटीचा हार दिसत आहे. या फोटोमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
भारतातील संतप्त नेटिझन्सनी हा प्रकार आक्षेपार्ह आणि 'हिंदूफोबिक' असल्याचे म्हटले आहे. भारतातील अनेक संतप्त ट्विटर वापरकर्त्यांनी थेट ट्विटर सीईओ इलॉन मस्क आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना टॅग करण्यास सुरुवात केली आहे. तसेच वापरकर्त्यांनी दोघांकडे युक्रेनवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने काही वेळातच हा फोटो आणि ट्विट काढून टाकले. पण तोपर्यंत त्याचा स्क्रीन शॉट व्हायरल झाला होता.
वृत्तसंस्था