अमेरिकेत पर्यटक विमान कोसळले
#न्यूयॉर्क
अमेरिकेत एक खासगी छोटे विमान कोसळल्याचे वृत्त असून या विमानातून प्रवास करणाऱ्या एका भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिची मुलगी आणि वैमानिक हे दोघे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. रविवारी न्यूयॉर्कमधील नॉर्थ लिंडेनहर्स्ट इथे
ही घटना घडली. स्थानिक माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.
या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव रोमा गुप्ता (वय ६३) तर तिच्या मुलीचे नाव रीवा गुप्ता (वय ३३) आहे. माध्यमांतील प्राथमिक माहितीनुसार, सफोल्क काऊंटी पोलिसांना वैमानिकाची ओळख पटली आहे. त्याचे नाव फैझुल चौधरी (वय २३) असून त्याला स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईस्ट फर्मिंगडेलच्या रिपब्लिक एअरपोर्टवरून दुपारी २.१८ वाजता छोट्या विमानाने उड्डाण केले. यामध्ये तीन व्यक्ती होत्या, यामध्ये दोन महिलांचा समावेश होता.
हे पर्यटक विमान होते. विमानातून धूर येत असल्याचे वैमानिकाला दिसून आले, त्यानंतर त्याने याची माहिती तातडीने रिपब्लिक एअरपोर्टच्या एअर ट्रॅफिक कन्ट्रोलला दिली. यानंतर या विमानाला इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी देण्यात आली. पण विमानतळावर उतरण्यापूर्वीच हे कोसळले. हे विमान मोकळ्या जागेत कोसळल्याने इतर कोणीही या दुर्घटनेत जखमी झालेले नाही किंवा कुठल्याही मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. खरंतर या विमानातील वैमानिकाने अशा परिस्थितीत विमानावर नियंत्रण मिळवण्याचे प्रशिक्षण घेतलेले असते. पण लँडिंगवेळी विमानाचा स्पीड अपेक्षित स्पीडपेक्षा खूपच कमी झाल्याने विमान क्रॅश झाले, अशी माहिती विमान कंपनी फरमिंगडल स्टेट कॉलेज ऑफ एव्हिएशनचे संचालक मायकल कँडर्स यांनी दिली आहे.
वृत्तसंंस्था