आत्ममग्न युवकाने केला जागतिक विक्रम
#कॅलिफोर्निया
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे आयोजित करण्यात आलेल्या 'लिजेंड ॲण्ड गीनिज वर्ल्ड रेकॉर्ड्स हॉल ऑफ फेम' मध्ये २१ वर्षीय तरुणाने इतिहास रचला आहे. कमी वेळात ३x३x३ रुबिक क्यूब सोडवून हा विक्रम आपल्या नावे करणाऱ्या या तरुणाचे नाव मॅक्स पार्क आहे. मॅक्स जेव्हा दोन वर्षांचा होता तेव्हापासून तो आत्ममग्नतेच्या आजाराने त्रस्त आहे. सध्या सोशल मीडियावर मॅक्स पार्क आणि त्याच्या या जागतिक विक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.
मॅक्स पार्कने ३x३x३ रुबिक क्यूब फक्त ३.१३ सेकंदात सोडवला आहे. याचा व्हीडीओ सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय होत आहे. याआधी कमी वेळात रुबिक क्यूब सोडवण्याचा जागतिक विक्रम चीनच्या एका युशेंग डू नावाच्या व्यक्तीकडे होता. २०१८ मध्ये युशेंग डू याने ३.४७ मिनिटांमध्ये रुबिक क्यूब सोडवला होता, पण आता मॅक्सने हा विक्रम मोडला आहे.
गीनिज वर्ल्ड रेकॉर्ड्च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा मॅक्सचा रुबिक क्यूब सोडवतानाचा व्हीडीओ प्रसारित करण्यात आला आहे. या व्हीडीओत
मॅक्सने फक्त ३.१३ सेकंदात कसा रुबिक क्यूब सोडवला, हे स्पष्ट दिसते आहे. मॅक्सने किमान वेळात रुबिक क्यूब सोडवून जागतिक विक्रम प्रस्थापित केल्यानंतर तिथे हजर असणारा प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला आणि टाळ्या वाजवून त्यांनी मॅक्सचे कौतुक केले. मॅक्सच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता.
मॅक्सच्या नावे आणखी काही विक्रमांची नोंद
मॅक्सने ३.१३ सेकंदात ३x३x३ रुबिक क्यूब सोडवून जागतिक विक्रम केला आहे. मात्र याआधीही त्याच्या नावे ४x४x४, ५x५x५, ६x६x६ आणि ७x७x७ स्पीड क्यूबिंगचा जागतिक विक्रम आहे. २८ नोव्हेंबर २००१ रोजी जन्मलेल्या मॅक्स पार्कला 'रुबिक क्यूब स्पिडसॉल्व्हर' म्हणून ओळखले जाते. मॅक्सच्या नावे स्पीड क्यूबिंगचे अनेक विक्रम आहेत. मॅक्स सीरिटोस कॅलिफोर्नियामध्ये राहतो. त्याच्या आई-वडिलांचे नाव मिकी आणि श्वान पार्क आहे. मॅक्स जेव्हा दोन वर्षांचा होता तेव्हापासून तो आत्ममग्नतेच्या आजाराने त्रस्त आहे. आत्ममग्नता हा एक प्रकारचा विकार असून या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला संवाद साधताना किंवा इतरांशी संवाद साधताना अडचण येते. आजाराने ग्रस्त असूनसुद्धा मॅक्सने केलेली आतापर्यंतची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. मॅक्सवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.