संरक्षणावर छप्परफाड खर
#पेंटागॉन
आपल्या देशाचे संरक्षण करणे हे प्रत्येक देशाचे आद्य कर्तव्य असते. त्यामुळे देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकांवर प्रत्येक देश हात मोकळे सोडून खर्च करत असतो. मग त्यासाठी हवा तेवढा खर्च करण्याची संबंधित सरकारची भूमिका असते. आपल्याकडे किती शस्त्रास्त्र शक्ती आहे हे दाखवून देण्याचा देखील अट्टाहास प्रत्येक देशाचा असतो. पण या सगळ्यात कितीतरी खर्च केला जातो. तोच खर्च स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिट्यूटने (एसआयपीआरआय) एका अहवालातून जगासमोर सादर केला आहे.
जगाने २०२२ या वर्षात संरक्षण या विषयावर २२४० दशलक्ष डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांत १८३ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. एसआयपीआरआयच्या अहवालानुसार, जगाचा सैन्यावरील खर्च हा १८३ लाख कोटी रुपये इतका झालेला आहे. यामध्ये अमेरिका हा प्रथम क्रमांकावर असून भारत चौथ्या स्थानावर आहे. २०२२ मध्ये जागतिक लष्करी खर्चात ३.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२२ मध्ये झालेला खर्च हा आतापर्यंत झालेल्या खर्चापेक्षा सर्वाधिक असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
खर्च करण्यात युरोपियन देश आघाडीवर
एसआयपीआरआयच्या अहवालानुसार, युरोपीय देशांत सर्वाधिक खर्च करण्यात आलेला आहे. युरोपीय देशांनी १३ टक्के खर्च लष्करासाठी केला आहे. यात युक्रेनचा खर्च सर्वाधिक म्हणजेच ४४ अब्ज डॉलरवर गेला आहे. याचे कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनचे युद्ध. या युद्धाचा परिणाम म्हणून युरोपीय देशांनी यंदा शस्त्रास्त्रांवरील खर्चात वाढ केली आहे. जगभरातील आघाडीच्या १५ देशांनी एकूण खर्चाच्या ८२ टक्के खर्च लष्करी आयुधांवर केला आहे. अमेरिकेने एकूण खर्चाच्या ३९ टक्के म्हणजेच ८७७ अब्ज डॉलर खर्च केला आहे. त्यापाठोपाठ चीनचा खर्च असून चीनने एकूण खर्चाच्या १३ टक्के म्हणजेच २९२ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असून ८१ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. हा खर्च एकूण खर्चाच्या ३.६ टक्के इतका आहे.
वृत्तसंस्था