लंडनमधील खड्ड्यांना नूडलचा आधार
#लंडन
खड्ड्यांनी भरलेले रस्ते पुण्या-मुंबईतच असतात असे नाही. ते चक्क इंग्लंडमधील लंडनमध्येही असतात. अर्थात, आपल्याकडील विशाल खड्ड्यांकडे लक्ष वेधले जावे यासाठी कोणी वाढदिवस साजरा करतात तर कोणी तेथे वृक्षारोपण करतात. लंडनमध्ये अशा खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ते नूडलने भरले जातात. अशा बाबतीत साऱ्या इंग्लंडमध्ये प्रसिद्धी मिळवणारा मार्क मोरेल हा तर मि. पॉटहोल या नावाने ओळखला जातो. प्रसारमाध्यमांनी त्याच्या कार्यामुळे त्याला उचलून धरल्यामुळे त्याच्यावरची जबाबदारीही वाढली आहे. प्रसिद्धी मिळत असली तरी तेथील खड्डे आणि त्यांच्या स्थितीत काही फार बदल झालेला दिसत नाही. खड्ड्यांबाबत प्रशासनात जबादारीची जाणीव निर्माण व्हावी यासाठी आणि देशातील वाढत्या खड्ड्यांमुळे नैराश्य आलेल्या मोरेलने खड्डे नूडलने भरण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. वाढत्या खड्ड्यांबाबत सरकारने काही तरी पावले उचलावी यासाठी मोरेलने आता नूडल तयार करणाऱ्या एका प्रसिद्ध कंपनीबरोबर करार केला आहे.
यापूर्वी मोरेल खड्ड्यांमध्ये रबर भरायचा किंवा खड्ड्यांचे वाढदिवस साजरे करत खड्ड्यांमध्ये केक कापायचा. मात्र, त्याच्या कल्पनांना फार काही यश मिळाले नाही. त्यामुळे मोरेल म्हणतो की, नूडलशिवाय खड्डे काही भरत नाही असे दिसते. यामुळे देशातील खड्ड्यांच्या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी नूडल ब्रॅण्डशी करार करण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग असू शकतो ? देशातील खड्ड्यांचा प्रश्न आता तीव्र स्वरूप धारण करत आहे. आता त्याकडे लक्ष वेधण्यासाठी गेली दहा वर्षे मी मोहीम चालवत आहे. हे खड्डे किती धोकादायक आहेत हे दाखवण्यासाठी आतापर्यंत मी माझ्या पदरचा खर्च करून नूडल भरत होतो. खड्ड्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करणे, खड्ड्यात पाणी भरून तरंगणारे प्लास्टिकचे बदक सोडणे, मासेमारी करणे, पाणबुडीची मॉडेल त्यात सोडणे असे अनेक प्रकार केले.
मोरेलच्या मतानुसार रस्त्यावरील खड्डे हा एक मोठा सामाजिक धोका आहे. खड्ड्यांत पडून मृत्यू झालेल्या अनेक सायकलपटूंच्या कुटुंबांना तो भेटलेला आहे. इंग्लंडमधील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आठवड्यातून एक तरी सायकलपटू मृत्युमुखी पडतो किंवा सारे जीवन बदलून टाकणाऱ्या अपघाताला सामोरा जातो. मोरेल म्हणतो, आपण ठरवून प्रयत्न केले तर हे अपघात आणि मृत्यू आपण टाळू शकतो.
वृत्तसंस्था