ब्रिटनमध्ये गुरुद्वारात अल्पवयीनाचा भाविकांवर कृपाणने हल्ला, दोन जखमी
#लंडन : ग्रेव्हसेंड येथील गुरुद्वारात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने भाविकांवर कृपाणने हल्ला केला. यामध्ये दोन पंजाबी मुली जखमी झाल्या आहेत. त्यांच्या हाताला जखमा झाल्या आहेत.
पोलिसांनी भाविकांच्या मदतीने आरोपीला पकडले आहे. त्याचे व्हीडीओही समोर आले आहेत. आरोपीच्या कपाळातून रक्त येत होते. सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत. आरोपी किशोर हा ब्रिटिश नागरिक आहे. गुरुवारी संध्याकाळी ग्रेव्हसेंडच्या गुरू नानक दरबार येथे ही घटना उघडकीस आली. भाविक गुरुद्वाराच्या आवारात दर्शन घेत होते. यावेळी, आरोपी किशोर शीख भक्त असल्याचे भासवत आवारात घुसला. डोकं टेकवताना त्याने तेथे ठेवलेला कृपाण उचलला. कृपाण घेऊन तो भक्तांच्या दिशेने गेला आणि त्यांच्यावर वार करू लागला.
यात दोन पंजाबी मुली जखमी झाल्या आहेत. एका मुलीच्या हाताला दुखापत झाली आहे, तर दुसऱ्या मुलीच्या हातातून रक्तस्राव होत होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. हजर असलेल्या एकाने आरोपीवर नियंत्रण ठेवले नसते तर त्याने त्यांची हत्या केली असती, असे मुलींचे म्हणणे आहे. तो जिवे मारण्याच्या उद्देशाने गुरुद्वारात आला होता.
घटनेनंतर गुरुद्वारा परिसरात उपस्थित भाविकांचा जमाव किशोरला रोखण्यासाठी पुढे सरसावला. गुरुद्वाराच्या बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांनीही तत्काळ किशोरला ताब्यात घेतले. एका स्थानिक रहिवाशाने या घटनेची माहिती केंट पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचे हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच एअर ॲम्ब्युलन्स गुरुद्वाराच्या मैदानात दाखल झाली आणि जखमींना सुविधा पुरवली.
ग्रेव्हसेंडच्या लेबर खासदार डॉ. लॉरेन सुलिव्हन यांनी सांगितले की, गुरुद्वारातील घटनेने त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी तातडीने कारवाई केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. वृत्तसंंस्था