अखंड भारताच्या विरोधात ‘ग्रेटर नेपाळ’चा नकाशा
#काठमांडू
भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावाचे आहेत. हे संबंध पूर्ववत करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असतानाच भारताच्या नव्या संसदेत बसवलेल्या अखंड भारताच्या नकाशाच्या निषेधार्थ नेपाळमधून ‘ग्रेटर नेपाळ’चा नकाशा समोर करण्यात आला आहे.
नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूचे महापौर बालेंद्र शहा यांनी हा ‘ग्रेटर नेपाळ’चा नकाशा जारी केला आहे. नकाशामध्ये, हिमाचलमधील पश्चिम कांगडा ते पश्चिम बंगालमधील पूर्व तिस्तापर्यंतचा भाग ‘ग्रेटर नेपाळ’चा भाग म्हणून वर्णन केला आहे. भारताच्या नव्या संसदेत अखंड भारताचा नकाशा बसविल्याच्या निषेधार्थ महापौर शहा यांनी हे कृत्य केले आहे. या प्रकरणावर नेपाळ सरकारने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
नेपाळच्या संसदेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसचे सरचिटणीस गगन थापा यांनी गुरुवारी सांगितले, ‘‘ग्रेटर नेपाळचा नकाशा अधिकृतपणे प्रकाशित केला जावा. जर भारताने सांस्कृतिक नकाशा प्रकाशित केला असेल, तर आम्हाला ग्रेटर नेपाळचा सांस्कृतिक नकाशा प्रकाशित करण्याचा अधिकार आहे. भारताला यावर आक्षेप नसावा.’’ त्यावर पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड म्हणाले ‘‘भारत दौऱ्यावर मोदींशी चर्चा केली होती, अखंड भारत हा फक्त सांस्कृतिक नकाशा आहे.’’
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी अखंड भारताच्या नकाशावर भारताला पाठिंबा दिला. थापा यांच्या वक्तव्यावर ते संसदेत म्हणाले, ‘‘मी माझ्या भारत भेटीदरम्यान अखंड भारताच्या नकाशाचा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा भारताने मला सांगितले की, हा फक्त एक सांस्कृतिक नकाशा आहे, जो इतिहास दाखवत आहे. याला राजकीयदृष्ट्या पाहू नका.’’
नेपाळमधील बरेच लोक अजूनही ग्रेटर नेपाळचे काही भाग परत घेण्याची मागणी करत आहेत. नेपाळमधील राष्ट्रवादी कार्यकर्ते फणिंद्र दीर्घकाळापासून अखंड नेपाळचा प्रचार करत आहेत. नेपाळमधील काही पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, ‘‘काही वर्षांपूर्वी भारतात विलीन झालेला त्याचा भाग आता परत केला पाहिजे.’’
संसदेच्या नवीन इमारतीच्या आर्ट गॅलरीत बसवण्यात आलेल्या अखंड भारताच्या शिल्पावरून नेपाळमधून ही प्रतिक्रिया उमटत आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या संदर्भात भारताची बाजू मांडली. ते म्हणाले, ‘‘हा फक्त एक सांस्कृतिक नकाशा आहे जो प्रत्यक्षात सम्राट अशोकाचे साम्राज्य दाखवतो. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. नेपाळसारख्या मैत्रीपूर्ण देशांना हे समजले आहे.’’
याआधी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, नवीन संसदेत बसवण्यात आलेल्या अखंड भारताचा नकाशा अशोक साम्राज्याचा विस्तार दर्शवतो. त्यासाठी नकाशासमोर फलक लावून माहितीही देण्यात आली आहे.