तरुणाच्या पोटातून काढली व्होडकाची बाटली
#काठमांडू
नेपाळमधील डॉक्टरांनी एका २५ वर्षीय तरुणाच्या पोटातून शस्त्रक्रिया करून व्होडकाची बाटली बाहेर काढली आहे. या तरुणाला पोटात वेदना होत होत्या म्हणून दाखल करण्यात आले होते. दरम्यान या युवकाला दारू पाजून त्याच्या मित्रांनी ही बाटली त्याच्या गुदद्वारात घुसवली असल्याचे समोर आले असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
रौतहाट जिल्ह्यातील गुजरा शहरात वास्तव्यास असणाऱ्या नूरसाद मन्सूरी याच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. त्यामुळे त्याला नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली.
नूरसादला पाच दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अडीच तास शस्त्रक्रिया करून ही बाटली यशस्वीरित्या काढण्यात आली. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, काचेच्या बाटलीमुळे तरुणाच्या आतड्यांना इजा झाली होती. त्याच्या आतड्यांना सूज आली होती, पण शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूरसादच्या मित्रांनी त्याला दारू प्यायला लावली असावी. यानंतर त्याच्या गुदद्वारात जबरदस्तीने बाटली घातली. ही बाटली गुदद्वारातून नूरसादच्या पोटात घुसवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. रौतहाट पोलिसांनी शेख समीम नावाच्या व्यक्तीला अटक केली. नूरसादच्या काही मित्रांचीही चौकशी करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या प्रादेशिक पोलीस कार्यालयाने शेख समीमवर संशय व्यक्त केला आहे. नूरसादचे आणखी काही मित्र फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती रौतहटचे पोलीस अधीक्षक बीरबहादूर बुधा मगर यांनी दिली.वृत्तसंंस्था