जगावर येणार जैविक अस्त्राचे महासंकट?
#बीजिंग
भविष्यातील युद्ध जैविक अस्त्रांनी खेळली जातील, ही भविष्यवाणी सार्थ ठरण्याची शक्यता आहे. चीनच्या लष्करी संशोधन विभागात मानवी मेंदूवर हल्ला करणारे जैविक अस्त्र विकसित करण्यात येत असल्याची माहिती एका अहवालाद्वारे समोर आली आहे. हा अहवाल सार्वत्रिक करण्यात आलेला नाही, मात्र काही माध्यमांनी यातील माहिती उघड केली आहे.
प्रत्यक्ष समोरासमोर युद्धाचा काळ गेल्यावर जगाने अणुयुद्धाची दाहकता अनुभवली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात वापरली गेलेली शस्त्रास्त्रेही कालबाह्य ठरली आहेत. शत्रू राष्ट्राला धडा शिकवण्यासाठी आता अनेक प्रगत देश अत्याधुनिक विज्ञानाचा-तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. कोविड-१९ अथवा कोरोना या विषाणूचा जगभरात झालेला संसर्ग हे भविष्यातील अस्त्र म्हणून ओळखले जायला लागले आहे. हा विषाणू चीनमधील वूहानच्या प्रयोगशाळेत विकसित करण्यात आला असल्याचे वृत्त जगभरात पसरले आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून आता चीन मानवी मेंदूवर आघात करणारा विषाणू विकसित करत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.
त्यामुळे कोरोनानंतर आता जगावर आणखी एक मोठे संकट येण्याची शक्यता आहे. चीनचे सरकार आपल्या लष्कराच्या मदतीने एक जैविक अस्त्र तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे. 'सीसीपी बायोथ्रेट इनिशिएटिव्ह' अंतर्गत चीन हे जैविक अस्त्र तयार करत आहे. चीनचे पीपल्स लिबरेशन आर्मी न्यूरोस्ट्राईक पद्धतीच्या शस्त्रांमध्ये प्रस्थापित म्हणून ओळखले जाते. मानवांसह इतर सस्तन प्राण्यांच्या मेंदूवर हल्ला करण्यासाठी, किंवा त्यावर नियंत्रण आणण्यासाठी ही शस्त्रे ओळखली जातात. या अहवालात असा दावा केला आहे की, या शस्त्रांच्या माध्यमातून मायक्रोव्हेव्ह किंवा थेट ऊर्जा शस्त्रांचा वापर करून मेंदूवर हल्ला करतात. हातातील बंदुकीद्वारे अथवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम अशा गोष्टींच्या माध्यमातून देखील हा हल्ला करता येतो.
कसे असते मेंदूवर मारा करणारे शस्त्र?
न्यूरोस्ट्राईक म्हणजे, विशिष्ट गतिज ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून माणसांच्या थेट मेंदूंना लक्ष्य करणे. यामुळे मेंदूवर परिणाम होऊन, संबंधित व्यक्तींना मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतात, हे आजार झालेले व्यक्ती दीर्घकाळ त्याच्या प्रभावाखाली राहतात. त्यावरील उपचार शक्य नसल्याने बाधित म्हणूनच त्यांचा अंत होतो.