इजिप्तमध्ये सापडली आठव्या शतकातील बुद्ध मूर्ती
#काहिरा
इजिप्तच्या बेरेनीस बंदर परिसरात पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासकांना नुकतेच गौतम बुद्धांची मूर्ती आणि संस्कृतमधील शिलालेख सापडले असून याबाबत एक शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे साधारण आठव्या शतकात भारत आणि रोमन साम्राज्यामध्ये इजिप्तमार्गे होणारा व्यापार, बौद्ध तत्त्वज्ञानाचा अनेक देशांमधील प्रसार या विषयाला नवा आयाम मिळाला आहे.
अमेरिकन-पोलिश मोहिमेने केलेल्या उत्खननात २०१८ साली डेलावेअर विद्यापीठाचे प्रा. स्टीव्हन साइडबोथम आणि त्यांच्या संघाला गौतम बुद्ध यांची इसिस देवीला समर्पित केलेली संगमरवरी मूर्ती शहराच्या मुख्य रोमन काळातील मंदिरासमोर उत्खननात सापडली. १९९४ पासून हे उत्खनन सुरू आहे. मात्र त्यावेळी
या मूर्तीचे फक्त धड संशोधनात सापडले होते. मूर्तीबाबत जर्मन परिषदेत ही मूर्ती गौतम बुद्धांची असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. करोना काळानंतर २०२२ साली झालेल्या उत्खननात या मूर्तीचे शीर सापडले. त्यामुळे ही मूर्ती गौतम बुद्धांचीच असल्याचे स्पष्ट झाले. या मूर्तीशिवाय, पुरातत्त्वशास्त्रज्ञांना रोमन सम्राट फिलिप द अरब २४४ ते २४९ इ.स. पूर्वच्या शासनाशी संबंधित संस्कृत भाषेतील शिलालेखदेखील सापडला आहे.
या शिलालेखाचा पुरातत्त्वशास्त्रज्ञ बारकाईने अभ्यास करत आहेत. इसिस देवीच्या मंदिरातील इतर शिलालेख हे ग्रीक भाषेतील आहेत. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मंदिरात सातवाहनांच्या मध्य-भारतीय राज्याची दुसऱ्या शतकातील दोन नाणीही या उत्खननात सापडली. अलीकडेच इजिप्तच्या पुरातत्त्व परिषदेने हे संशोधन जाहीर केले. हे संशोधन प्रा. स्टीव्हन साइडबोथम, डॉ. मॉरिस गोयझेड आणि अन्य पुरातत्त्व शास्त्रज्ञ अमेरिकेतील पुरातत्त्व संस्थेसमोरही सादर करणार आहेत. या संशोधनामुळे भारतीय पुरातत्त्व अभ्यासात महत्त्वाची भर पडली आहे.
दरम्यान भारत आणि रोमन साम्राज्यामधील दुवा म्हणजे इजिप्त. ७०० ते ८०० वर्षांपूर्वी म्हणजेच ८ व्या शतकात रोमन साम्राज्य आणि भारतातील आयात-निर्यात समुद्र व भू-मार्गे होत असे. त्यामुळे इजिप्त हे व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र होते. इजिप्तच्या लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील रोमन-युगीन बंदरे व्यापारात गुंतलेली होती. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे बेरेनीस हे बंदर. मिरपूड, रत्ने, कापड आणि हस्तिदंत यांच्या व्यापारासाठी भारतातून जहाजे या बंदरावर येत. बेरेनीके येथे माल उतरवून तो उंटांवर लादून वाळवंट ओलांडून नाईल नदीपर्यंत पोहोचवला जात असे. त्यानंतर तो उर्वरित रोमन साम्राज्यात विक्रीसाठी जात होता.
वृत्तसंस्था