माऊंट एव्हरेस्टजवळ हेलिकॉप्टर कोसळून ६ ठार
#काठमांडू
पूर्व नेपाळमध्ये ‘माऊंट एव्हरेस्ट’जवळ मंगळवारी (११ जुलै) एका खासगी व्यावसायिक हेलिकॉप्टर कोसळले. यात एका मेक्सिकन कुटुंबातील पाच सदस्यांसह सहा जण मृत्युमखी पडले. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापक ज्ञानेंद्र भुल यांनी सांगितले की, ‘मनांग एअर’चे हेलिकॉप्टर ‘९ एन-एएमव्ही’ने सकाळी दहा वाजून चार मिनिटांनी सोलुखुंबू येथील सुर्की विमानतळावरून काठमांडूला जाण्यासाठी उड्डाण केले होते.
मंगळवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास १२ हजार फूट उंचीवर असताना हेलिकॉप्टरचा अचानक संपर्क तुटला. दुर्गम डोंगराळ सोलुखुंबू जिल्ह्यात हे हेलिकॉप्टर कोसळले. त्रिभुवन विमानतळाचे प्रवक्ते टेकनाथ सितौला यांनी सांगितले, की शोध मोहिमेदरम्यान अपघातस्थळावरून सहाही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. येथील डोंगराळ प्रदेशाचा हवाई दौरा करून हे लोक सुर्कीहून काठमांडूला परतत होते.
‘मनांग एअर’चे व्यवस्थापक राजू न्यूपेन यांनी सांगितले की, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील सर्व सहा जण या अपघातात ठार झाले आहेत. या सहा जणांमध्ये कॅप्टन चेतबहादूर गुरुंग आणि मेक्सिकोचे पाच नागरिक आहेत. जिल्हा पोलिसप्रमुख दीपक श्रेष्ठ यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी मृतांची ओळख पटली आहे. सिफुएन्टेस जी. फर्नाडो (९५ वर्षे), सिफुएन्टेस िरकन इस्माईल (९८) या पुरुषांसह सिफुएन्टेस गोंगलेझ अब्रिल (७२), गोंगलेझ ओलासिओ लुझ (६५) आणि सिफुएन्टेस जी. मारिया जेसे (५२) या महिलांचा मृतांत समावेश आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे समजते. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. त्यांनी अपघातस्थळी आग लागल्याचे पाहिले. हेलिकॉप्टर लिखेपिके ग्रामीण पालिकेच्या लामजुरा भागात कोसळले.