संग्रहित छायाचित्र
पाकिस्तानमध्ये एकीकडे ईदमुळे बाजार फुललेले आहेत, तर दुसरीकडे घराबाहेर पडलेल्या लोकांना अडचणींचा सामाना करावा लागत आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीमध्ये हजारो भिकाऱ्यांनी डेरा टाकला आहे. लाखोंच्या संख्येने आलेल्या भिकाऱ्यांनी शहराच्या प्रत्येक गजबजलेल्या ठिकाणी घेराव घातल्याचे चित्र आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठा, ट्रॅफिक सिग्नल्स, शॉपिंग मॉल आणि मशिदींच्या बाहेर भिकाऱ्यांनी लोकांना अडवून पैसे मागणे सुरू केले आहे. .
सध्या पाकिस्तान तेल आणि खाण्या-पिण्यासाठी मोताद झालेले आहे. महागाईने उच्चांक गाठलेला असून त्यात हे नवीनच संकट लोकांपुढे उभे राहिले आहे. धड सुखाने बाहेर फिरणेही मुश्कील झालेले आहे. वाढत्या महागाईने लोक जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी धडपडत असताना या भिकाऱ्यांना मिळणाऱ्या भिकेतही कमालीची कपात झालेली आहे.
द न्यूज इंटरनॅशनल या वृत्तपत्राने कराचीचे अतिरिक्त महानिरीक्षक इम्रान याकूब मिन्हास यांच्या हवाल्याने म्हटले की, साधारण तीन ते चार लाख सराईत भिकारी ईदच्या पार्श्वभूमीवर कराचीसारख्या महानगरांमध्ये आलेले आहेत. मिन्हास पुढे म्हणाले, भिकारी (Pakistani Beggers) आणि आरोपी प्रकारातील लोक कराचीला एक प्रमुख बाजारपेठेचे शहर समजतात. हे भिकारी सिंध, बलुचिस्तान आणि देशातील इतर ठिकाणांहून कराचीत येतात. या गर्दीमुळे आम्ही पारंपरिक पद्धतीने आरोपींचा तपास लावू शकत नाहीत. त्यामुळे कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू ठेवण्यात आला आहे. गुन्हेगार भिकाऱ्यांच्या गर्दीत मिसळण्याची शक्यता असल्याने पोलीस यंत्रणेवर ताण आल्याचे त्यांनी मान्य केले आहे.
बहुतांश पाकिटमार पाकिस्तानी
पाकिस्तानी भिकारी जियारतच्या आडून मध्य पूर्वेची यात्रा करतात. प्रवासी पाकिस्तानी सचिव जीशान खानजादा यांनी मागच्यावर्षी सांगितले होते की, बहुतांश भिकारी तात्पुरत्या व्हिसावर सौदी अरेबियाला जातात. तिथे जाऊन भीक मागण्याच काम करतात. मक्का येथील भव्य मशिदीच्या आवारात अटक करण्यात आलेले बहुतांश पाकिटमार पाकिस्तानातील आहेत. कराचीमध्ये फक्त रमज़ानच्या महिन्यात गुन्हे घडले, त्यामध्ये कमीत कमी १९ जणांचा मृत्यू झाला.