चर्चवरील दहशतवाद्यांच्या गोळीबारात १५ जण मृत्युमुखी
#बुर्किना फासो
उत्तर बुर्किना फासोमध्ये रविवारी प्रार्थनेवेळी कॅथोलिक चर्चवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ नागरिक ठार झाले. हल्ल्यात दोन भाविक जखमी झाले आहेत. डौरीच्या बिशपचे पादरी जीन-पियरे सावडोगो यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारच्या प्रार्थनेसाठी लोक जमलेले असतानाच हा हल्ला झाला.
चर्चमधील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार देशाच्या संघर्ष सुरू असलेल्या उत्तर भागात प्रार्थनेसाठी जमलेल्या भाविकांवर बंदूकधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. एसॅकेन गावातील चर्चमध्ये झालेला गोळीबार हा दहशतवादी हल्ला होता. डोरीच्या कॅथोलिक डायोसिसचे ॲबोट जीन-पियरे सवाडोगो यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात कॅथोलिक पंथाच्या १५ भाविकांचा घटनास्थळी मृत्यू झाला. बुर्किना फासो हा विस्तीर्ण साहेल प्रदेशाचा एक भाग आहे. २०११ मध्ये लिबियात सुरू झालेल्या गृहयुद्धानंतर अतिरेक्यांच्या हिंसक कारवाया वाढल्या होत्या. तेव्हापासून हा भाग एकाकी पडला आहे. त्यानंतर २०१२ मध्ये उत्तर मालीचा इस्लामी दहशतवाद्यांनी ताबा घेतला होता. २०१५ पासून बुर्किना फासो आणि नायजर भागात जिहादी अतिरेक्यांचा हिंसाचार सुरू आहे. कॅप्टन इब्राहिम ट्रोर यांनी २०२२ मध्ये सत्ता काबीज केली. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत देशात झालेले हे दुसरे सत्तापरिवर्तन होते. दोन्हीही जिहादी गटांचा हिंसाचार रोखण्यात सरकार मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरलेले आहे. यामुळे देशातील जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलेला आहे. हिंसाचारात बुर्किना फासोमधील सुमारे वीस हजार नागरिक लोक मारले गेले आहेत, तर २० लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. तसेच हल्ल्याबबात अधिक माहितीही उपलब्ध झालेली नाही. हा हल्ला जिहादी गटांनी केल्याचा संशय आहे. हे जिहादी गट दुर्गम भागात दडून अनेक वेळा समाजातील काही विशिष्ट घटक किंवा सुरक्षा दलांवर हल्ले करत असतात. हे हल्ले प्रामुख्याने उत्तरेकडील भागात अधिक प्रमाणात होतात.