लेबनॉनवरील इस्राएलच्या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू
#राफा
दक्षिण गाझामध्ये कारवाई करण्याचा इशारा देणाऱ्या इस्राएलने शुक्रवारी युनिस शहरातील प्रमुख रुग्णालयामध्ये सैनिक घुसविले. यामुळे रुग्णांत आणि परिसरात गोंधळ उडाला असून दहशतीचे वातावरण आहे. यावेळी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान, इस्राएलने लेबनॉनच्या दक्षिण भागात हवाई हल्ला केल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये हिज्बुल्ला संघटनेच्या तीन दहशतवाद्यांबरोबरच १० नागरिकांचा समावेश आहे.
इस्राएलच्या लष्कराने या भागात राहात असणाऱ्या नागरिकांना निघून जाण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी त्यांच्यासाठी एक मार्ग निश्चित केल्यावर हजारोजणांवर पुन्हा एकदा विस्थापित होण्याची वेळ आली आहे.
हमासला संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी आणि अपहृतांचा शोध घेण्यासाठी दक्षिण गाझामध्ये जमिनीवरील कारवाई करण्याचा इस्राएलचा निश्चय आहे. जीवितहानी टाळण्यासाठी अमेरिकेसह अनेक देशांनी या कारवाईला विरोध केला असला तरी इस्राएलने दोन दिवसांपूर्वी खान युनिस भागातील नागरिकांना निघून जाण्यास सांगितले होते.
शहरातील नागरिकांसह येथे उत्तर गाझामधून विस्थापित झालेले हजारो लोक वास्तव्याला आहेत. इस्राएलच्या सैनिकांनी या शहरातील नासीर रुग्णालयावर तुफान गोळीबार केला आणि नंतर आतमध्ये प्रवेश करत येथे आश्रय घेतलेल्या विस्थापितांना बाहेर काढले. या गोळीबारात एका रुग्णाचा मृत्यू झाला.
वृत्तसंंस्था
लेबनॉनमध्येही हल्ला
इस्राएलने आज लेबनॉनच्या दक्षिण भागात हवाई हल्ला केल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये हिज्बुल्ला संघटनेच्या तीन दहशतवाद्यांबरोबरच १० सामान्य नागरिकांचा समावेश आहे. हिज्बुल्लाने उत्तर सीमेवरून केलेल्या रॉकेटच्या माऱ्यात एका इस्राएली सैनिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही तासांतच इस्राएलने हा हल्ला केला.