भारताकडून खेळण्याची रिंकूत क्षमता : अँडी फ्लॉवर
#कोलकाता
कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल-१६ मध्ये आपल्या अखेरच्या सामन्यात एका धावेने पराभूत झाल्यामुळे हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. असे असले तरी यंदाच्या सत्रात रिंकूसिंगच्या कामगिरीने सर्वच प्रभावित झाले आहेत. त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून खेळण्याची क्षमता असल्याचे मत झिम्बाब्वेचे माजी फलंदाज ॲण्डी फ्लाॅवर यांनी व्यक्त केले.
लखनौ सुपरजायन्ट्सविरुद्धच्या सामन्यात रिंकूने ३३ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावांची नाबाद आक्रमक खेळी साकारली. त्याने अखेरच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करूनदेखील हा सामना कोलकात्याला अवघ्या एका धावेने गमवावा लागला. याबरोबरच कोलकात्याचे स्पर्धेतील आव्हान संपले. सामन्यानंतर विजयी लखनौ संघाचे प्रशिक्षक आणि एकेकाळचे क्रिकेटविश्वातील दिग्गज फलंदाज अँडी फ्लॉवर यांनी रिंकूवर
स्तुतिसुमने उधळली. ते म्हणाले, ‘‘रिंकूमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे सर्व गुण आहेत. तो खूप चांगला फलंदाज आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे.’’
फ्लॉवर एवढ्यावरच थांबले नाहीत. रिंकूचा शारीरिक फिटनेस जबरदस्त आहे. शिवाय, मानसिकदृष्ट्या कणखर असल्याने तो दबावाच्या क्षणीदेखील आत्मविश्वासाने आक्रमक फलंदाजी करतो. त्याच्यात यशाची भूक आहे. तसेच तो खूप सभ्य आहे. दबावाखाली तो काय करू शकतो हे त्याने या स्पर्धेत अनेकदा दाखवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना ही बाब खूप महत्त्वाची ठरते.’’
यानंतर पत्रकार परिषदेला पोहोचलेल्या रिंकूला पत्रकारांनी फ्लाॅवर यांनी केलेल्या स्तुतीबद्दल विचारले असता तो नम्रपणे म्हणाला, ‘‘प्रत्येक खेळाडूप्रमाणे माझेही देशासाठी खेळण्याचे स्वप्न आहे. पण सध्या मी टीम इंडियात निवडीचा विचार करत नाही. माझे लक्ष माझ्या सरावावर आणि स्वतःवर काम करण्यावर आहे. येथून परतल्यानंतर मी घरी जाईन आणि माझा नियमित सराव पुन्हा सुरू करेन. सध्या मला फक्त आणि फक्त सरावावर लक्ष केंद्रित करायचे आहे.’’
‘‘रिंकूने या मोसमात ५९.२५ च्या सरासरीने ४ अर्धशतकांसह ४७४ धावा फटकावल्या. या दरमयान त्याचा स्ट्राईक रेट १४९.५२ असा प्रभावी आहे. भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री
यांनीही रिंकूमध्ये भारतीय संघाकडून खेळण्याची क्षमता असल्याचे मत व्यक्त केले आहे.
वृत्तसंस्था