जयपूर: टीम इंडियाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आता आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी त्याने याच संघाचा कर्णधार आणि मेन्टॉर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
द्रविड आणि राजस्थान राॅयल्स फ्रेंचायझी यांच्यादरम्यान अलीकडेच यासंदर्भात करार झाला आहे. हा करार किती दिवसांचा आहे आणि द्रविडला त्यासाठी किती रक्कम मिळणार आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
टीम इंडियातील द्रविडच्या कोचिंग स्टाफ टीमचा सदस्य विक्रम राठोडही राजस्थान रॉयल्ससोबत करार करू शकतो. राठोड हा टीम इंडियाचा फलंदाजी प्रशिक्षक होता. राहुल द्रविड हा नोव्हेंबर २०२१ ते जून २०२४ या काळात टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता. या वर्षी जूनमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होता. संघाला चॅम्पियन बनवूनही त्याने कार्यकाळ वाढवला नाही.
मुख्य प्रशिक्षक म्हणून भारताला टी-२० वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा द्रविड याआधी वेगवेगळ्या पण अतिशय महत्त्वाच्या भूमिकांमध्ये रॉयल्स संघाशी संबंधित आहे. आयपीएलच्या २०१२ आणि २०१३ च्या मोसमात तो संघाचा कर्णधार होता. याशिवाय तो २०१४ आणि २०१५ मध्ये टीम डायरेक्टर आणि मेंटॉरदेखील होता.