संग्रहित छायाचित्र
सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू आणि 'धडाकेबाज' ओपनर शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि डोमेस्टिक क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिखर धवनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि आपल्या निर्णयाबद्दल माहिती दिली. शिखर धवन टीम इंडियामध्ये 'गब्बर' या नावाने प्रसिद्ध आहेत. 38 वर्षीय शिखरने व्हिडिओ पोस्ट करत लिहिले- मी माझ्या क्रिकेट प्रवासाच्या अध्यायाचा शेवट करत आहे, मी माझ्यासोबत असंख्य आठवणी आणि कृतज्ञता घेऊन जात आहे. प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद! जय हिंद...
शिखर धवनने शनिवारी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या 13 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करिअरला अलविदा करत निवृत्तीची घोषणा केली. धवनने शेवटचा सामना यावर्षीच्या एप्रिलमध्ये आयपीएल 2024 मध्ये किंग्ज एलेव्हन पंजाबचे नेतृत्व करताना खेळला होता. त्याने 269 सामन्यांमध्ये 24 आंतरराष्ट्रीय शतकं (वनडे मध्ये 17 आणि टेस्ट क्रिकेट मध्ये 7) ठोकली आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये शिखर धवनने 40.61 च्या सरासरीने 2315 धावा केल्या, तर त्याने 7 शतके आणि 5 अर्धशतक ठोकली आहेत. तर वनडेमध्ये धवनने 44.11 च्या सरासरीने 6793 धावा केल्या ज्यात 17 शतके आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 11 अर्धशतकांसह 27.92 च्या सरासरीने 1759 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या महान खेळाडूंमध्ये शिखर धवनची गणना केली जाते. आयपीएलध्ये धवनने 222 सामन्यांमध्ये 35.07 च्या सरासरीने 6768 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 2 शतके आणि 51 अर्धशतके आहेत.
आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शिखर धवन काय म्हणाला?
आज जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा मला केवळ आठवणी दिसतात. पुढे मला संपूर्ण जग दिसत आहे. भारतासाठी खेळणं हे एक ध्येयं होतं. ते पूर्ण झालं. त्यासाठी मी अनेक लोकांचा आभारी असल्याचं म्हणत धवनने कुटुंबीय, प्रशिक्षक, बीसीसीआय डीडीसीएचे आभार मानले. कथेत पुढे जाण्यासाठी पानं उलटावी लागतात तसंच मी करणार असून मी आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. माझ्या क्रिकेट प्रवासाला निरोप देत असून देशासाठी खेळलो याचा मला आनंद वाटतो, असं शिखर म्हणाला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.