संग्रहित छायाचित्र
सिडनी: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ॲशेसइतकीच महत्वाची असल्याचे सांगत घरच्या मैदानावर प्रत्येक कसोटी जिंकण्यासाठीच खेळणार असल्याचा नमूद करीत भारतीय संघाला इशारा दिला आहे.
स्टार्क म्हणाला, गेल्या तीन दशकांत पहिल्यांदाच भारताविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पाच कसोटी सामने खेळवले जातील, त्यामुळे ही मालिका आमच्या संघासाठी ॲशेससारखी महत्त्वाची ठरणार आहे.’’
१९९१-९२ नंतर प्रथमच या मालिकेत पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे. ३४ वर्षीय स्टार्कने सांगितले की, ‘‘आम्हाला प्रत्येक सामना आमच्या घरच्या मैदानावर जिंकायचा आहे आणि आम्हाला हे देखील माहित आहे की भारतीय संघ खूप मजबूत आहे.’’
स्टार्कचा केवळ ही मालिका जिंकण्याचाच इरादा नाही, तर त्याच्या संघाने क्लीन स्वीप पूर्ण करावा, अशी त्याची इच्छा आहे. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आतुर आहेत. स्टार्कच्या आधी स्टीव्ह स्मिथ, कर्णधार पॅट कमिन्स, फिरकीपटू नॅथन लायन आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांनी मालिकेबाबत वक्तव्ये केली आहेत. १० वर्षांनंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया भारताला कसोटी मालिकेत पराभूत करेल, असा विश्वास सगळ्यांना आहे.
कसोटी क्रमवारीत भारत आणि ऑस्ट्रेलिया सध्या अव्वल स्थानावर आहेत. त्यामुळे चाहत्यांसाठी आणि अर्थातच खेळाडूंसाठी ही अतिशय रोमांचक मालिका असणार आहे. आशा आहे की ८ जानेवारीला ट्रॉफी आपल्या हातात येईल. जेव्हा जेव्हा मला बॅगी ग्रीन कॅप घालण्याची संधी मिळते तेव्हा ते खूप खास वाटते. आशा आहे की, आम्ही उन्हाळी सत्रातील पाचही कसोटी सामने जिंकण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास स्टार्कने व्यक्त केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.