संग्रहित छायाचित्र
रावळपिंडी: रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानला बांगलादेशाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने दोघांनाही दंड ठोठावण्यात आला आहे.
या कारवाईअंतर्गत आयसीसीने जागतिक कसोटी मालिकेच्या गुणतालिकेतून यजमान पाकिस्तानचे ६ तर बांगलादेशचे ३ गुण कमी केले आहेत. सदर पेनल्टीनंतर बांगलादेश सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर घासरला. आधी हा संघ दक्षिण आफ्रिकेच्या पुढे होता. ६ गुण गमावूनदेखील पाकिस्तान आठव्या क्रमांकावर कायम आहे. बांगलादेशने रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानचा १० गडी राखून पराभव केला होता.
आयसीसीने सांगितले की, 'रावळपिंडी कसोटीत पाकिस्तान संघ निर्धारित वेळेत ६ षटके टाकू शकला नाही. त्यामुळे ६ गुण वजा करण्यात आले. त्याचवेळी इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानला कसोटीत पराभूत करणाऱ्या बांगलादेशने वेळेवर ३ षटके टाकली नाहीत. त्यामुळे त्याचे ३ गुण वजा झाले. त्याचबरोबर पाकिस्तानच्या मॅच फीच्या ३० टक्के दंड तर बांगलादेशच्या मॅच फीच्या १५ टक्के दंडदेखील कापण्यात आला. या पेनल्टीनंतर पाकिस्तानकडे फक्त १६ गुण उरले आहेत. दुसरीकडे, पहिली कसोटी जिंकून सहाव्या स्थानावर पोहोचलेल्या बांगलादेशचे २१ गुण आहेत.
शकिब अल हसनलाही दंड
आयसीसीने बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनलाही दंड ठोठावला आहे. सामन्यादरम्यान त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानकडे चेंडू रागाने फेकला. रिझवानला दुखापत झाली नाही, पण चेंडू फेकल्यानंतर पंचांनी त्याला तसे न करण्याचा इशारा दिला होता. आयसीसीने सांगितले की, 'शकिबला मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आचारसंहितेतील लेव्हल वनचे उल्लंघन केल्याबद्दल शकिबचा एक डिमेरिट पॉइंटदेखील कापण्यात आला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.