संग्रहित छायाचित्र
कराड: भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास घडविणारे मराठमोळे कुस्तीपटू दिवंगत खाशाबा जाधव यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गोळेश्वर (ता. कराड) या खाशाबांच्या जन्मगावी होणार्या या क्रीडा संकुलासाठी राज्य मंत्रिमंडळाने अखेर २५ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधींची घोषणा केली आहे.
खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला वैयक्तिक क्रीडाप्रकारात पहिले पदक मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यांनी कांस्यपदक जिंकले होते. मात्र, आजवर खाशाबा जाधव यांचा यथोचित राष्ट्रीय सन्मान झाला नसल्याची सल कुस्तीप्रेमींमध्ये आहे.
गोळेश्वर (ता. कराड) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणीसाठी राज्य शासनाने ३० जुलै २००९मध्येच मान्यता दिली होती. त्यासाठी गोळेश्वर ग्रामपंचायतीने कराड तालुका क्रीडा संकुल समितीकडे जागाही वर्ग केली होती. या जागेवर क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी राज्य शासनाने तीन कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालयाच्या ६ ऑगस्ट २०१४च्या आदेशान्वये एक कोटी रुपयांचा निधी वितरितही केला होता. गोळेश्वर ग्रामपंचायतीने कुस्ती संकुलनासाठी ९५ गुंठे जागा देत ती जागा जिल्हा क्रीडा अधिकार्यांच्या नावे केली. यापैकी सद्य:स्थितीत ५८ गुंठे जागा कोठे आहे, हेच समजत नाही. तर, उर्वरित जागा शासनाच्या ताब्यात आहे. मागील वर्षी १४ ऑगस्टला तत्कालीन क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी कराड तहसीलदार कार्यालयात या विषयावर बैठक घेऊन क्रीडा संकुलाचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी गोळेश्वरमध्ये जागामोजणीची प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे आता तेथील ५८ गुंठे जागा लवकरच अतिक्रमणमुक्त होणार आहे.
खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुलाच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता देऊन २५ कोटी ७५ लाख रुपयांची घोषणा केली. त्यामुळे हे क्रीडा संकुल उभारणीची तब्बल १५ वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. या भव्य क्रीडा संकुलाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अॅडमिन एरिया, किचन व डायनिंग स्वच्छतागृह, जिम, व्हीआयपी रूम, ऑडिओ व्हिज्युअल रूम, फील्ड ऑफ प्ले, मॅट, मुला-मुलींची डॉमेंट्री, टॉयलेट, ५०० लोकांची आसनव्यवस्था असलेली प्रेक्षक गॅलरी या सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.