मुंबई: एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंणारी एकमेव भारतीय खेळाडू ठरलेला भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिने टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवकडून क्रिकेट खेळण्याच्या टिप्स घेतल्या.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी २२ वर्षीय मनू ‘नॅशनल क्रश’ ठरली आहे. भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करणारी मनू सध्या नवीन खेळांचे बारकावे शिकत आहे. नुकतीच तिने घोडेस्वारी, भरतनाट्यम आणि स्केटिंग शिकण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता ती क्रिकेट शिकतानाही दिसत आहे. रविवारी (दि. २५) मनूने भारताचा टी-२० कर्णधार सूर्यसोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम तसेच ‘एक्स’वर शेअर करीत त्याला “भारताच्या ‘मिस्टर ३६०’कडून मी नवीन खेळाचे तंत्र शिकत आहे,” असे भन्नाट कॅप्शन दिले आहे.
फोटोमध्ये मनू बॅटिंग पोज देताना दिसत आहे. पॅरिसमध्ये इतिहास रचल्यानंतर मनू सध्या तीन महिन्यांच्या विश्रांतीवर आहे. आता ती भारतीय संघाच्या टी-२० कर्णधाराकडून क्रिकेटचे तंत्र शिकत आहे. हा फोटो पाहून चाहते खूप खुश झाले आहेत.