मंगळवारी (दि. ४) स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी पाच पदके जिंकली. ही सर्व पदके ॲथलेटिक्समधील आहेत. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी १९ पदके जिंकली होती.भारताने आतापर्यंत ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कांस्यपदके जिंकली आहेत. पदकतालिकेत भारत सध्या १७ व्या क्रमांकावर आहे. चीन पहिल्या, ब्रिटन दुसऱ्या आणि अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दीप्ती जीवनजीने महिलांच्या ४०० मीटरमध्ये प्रथम कांस्यपदक जिंकले. त्यानंतर पुरुषांच्या एफ ४६ प्रकारातील भालाफेक स्पर्धेत अजित सिंगने रौप्यपदक तर सुंदर सिंग गुर्जरने कांस्यपदक पटकावले.
पुरुषांच्या टी४२ प्रकारातील उंच उडीत शरदकुमारने रौप्यपदक तर मरियप्पन थांगावेलूने कांस्यपदक जिंकले. उंच उडीमध्ये अमेरिकेच्या एझरा फ्रेचने सुवर्णपदक तर क्युबाच्या गुलेर्मो गोन्झालेझने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. भारताच्या शैलेश कुमारने उंच उडीत चौथे, तर रिंकू भालाफेकमध्ये पाचवे स्थान मिळवले. या दोन प्रकारातील भारताची पदके थोडक्यात हुकली.
पुरुषांच्या एफ ४६ प्रकारात भारताच्या सुंदरसिंग गुर्जरने ६८.६० मीटर भालाफेक करण्याचा विश्वविक्रम केला आहे. मात्र, या स्पर्धेत तो केवळ ६४.९६ मीटर भालाफेक करू शकला. यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अजित सिंगने ६५.६२ मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले.
क्युबाच्या गुलेर्मो गोन्झालेझने दुसऱ्या प्रयत्नात ६६.१४ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले. भारताच्या रिंकूने शेवटच्या प्रयत्नात ६१.५८ मीटरचा सर्वोत्तम थ्रो करून पाचव्या स्थानावर राहिला. या श्रेणीमध्ये अशा खेळाडूंचा समावेश होतो ज्यांचा एक हात नाही किंवा ज्यांचा एक हात काम करत नाही.
शरद कुमारने टी४२ आणि टी६३ प्रकारातील उंच उडीमध्ये १.८८ मीटर उडी मारून रौप्यपदक जिंकले. तर मरियप्पन थांगावेलूने १.८५ मीटर उडी मारून तिसरा क्रमांक पटकावला. अमेरिकेचा एझरा फ्रेंच १.९४ मीटर उडी मारून प्रथम आला. भारताचा शैलेश कुमार चौथ्या स्थानावर राहिला.
दीप्ती जीवनजीने महिलांच्या टी२० प्रकारात ४०० मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले. तिने ही शर्यत ५५.८२ सेकंदात पूर्ण केली. युक्रेनच्या युलिया शुल्यारने ५५.१६ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. तर तुर्कीच्या आयसेल ओंडरने ५५.२३ सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्यपदक पटकावले.
पॅरालिम्पिक गेम्सच्या ट्रॅक इव्हेंटमध्ये पदक जिंकणारी दीप्ती ही भारतातील दुसरी खेळाडू ठरली. तिच्या आधी प्रीती पाल हिने याच पॅरालिम्पिकमध्ये टी३५ प्रकारात १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत कांस्यपदके जिंकली आहेत.