संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: कनिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत विजेतेपद पटकावित इतिहास घडविणार्या भारतीय मुलींच्या संघाचे विमान चुकल्याने त्या अद्याप मायदेशी परतलेल्या नाहीत. राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि राष्ट्रीय कुस्ती महासंघ (डब्लूएफआय) यांच्या निष्काळजीपणामुळे या मुली जाॅर्डनमधील अमान विमानतळावरच अडकून पडल्या आहेत.
भारताच्या १७ वर्षांखालील वयाच्या ९ मुली शनिवारी (दि. २४) संध्याकाळी परतणार होत्या. मात्र, या जगज्जेत्या मुलींचा कुस्ती संघ जॉर्डनमधील अम्मान विमानतळावर अडकला आहे. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, कुस्तीपटूंचे उड्डाण चुकले आहे. कारण, ‘साई’ने खेळाडू आणि प्रशिक्षकांची तिकिटे वेगवेगळ्या एअरवेजवर बुक केली होती. प्रशिक्षक जय भगवान, शिल्पी शेओरन आणि रेखा राणी हे दुबईमध्ये थांबलेल्या एमिरेट्सच्या विमानात बसणार होते, तर कुस्तीपटूंसाठी कतार एअरवेजवर बुकिंग करण्यात आली होती. ‘साई’ आणि ‘डब्लूएफआय’च्या या निष्काळजीपणाबद्दल देशभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
प्रशिक्षकांची फ्लाइट अमानहून संध्याकाळी ६.१० वाजता निघून रात्री १०.१० वाजता दुबईला पोहोचणार होती. तेथून त्यांना पहाटे ३.५५ वाजता दुसर्या विमानात बसून सकाळी ९:०५ वाजता दिल्लीला पोहोचायचे होते. त्याचवेळी, कुस्तीपटूंचे विमानरात्री ८.३० वाजता निघून ११.१० वाजता दोहाला पोहोचणार होते. मात्र, फ्लाइटच्या वेळा बदलल्याने गोंधळ उडाला.
जॉर्डनला गेलेल्या १७ वर्षांखालील कुस्तीपटूंसोबत किमान एक तरी प्रशिक्षक असायला हवा होता. या लहान मुलींना असे वार्यावर सोडायला नको होते, असा साक्षात्कार आता राष्ट्रीय कुस्ती महासंघाला झाला आहे. त्यामुळे आता त्यामुळे आता या कुस्तीपटूंना पहिल्या उपलब्ध विमानाने आणण्यासाठी महासंघाची पळापळ सुरू झाली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.