रणजी स्पर्धा खेळा अन्यथा कारवाई

आयपीएलची तयारी करणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना बीसीसीआयचा इशारा; आपापल्या राज्याकडून पुढील फेरी खेळण्याचे आदेश

PlayRanjitournamentotherwiseaction

रणजी स्पर्धा खेळा अन्यथा कारवाई

मुंबई: विविध फाॅरमॅटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करीत असलेले जे खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार आहेत, त्यांना रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळणे बीसीसीआयने बंधनकारक केले आहे. असे न केल्यास खेळाडूंवर कारवाई करण्याचा इशारा बीसीसीआयने मंगळवारी (दि. १३) दिला.

कृणाल पंड्या, दीपक चहर, इशान किशन यांच्यासारख्या अनेक सीनियर खेळाडूंनी सध्या भारतीय संघाकडून खेळत नसतानाही रणजी स्पर्धेत खेळायचे टाळले आहे. हे खेळाडू सध्या आयपीएलसाठी तयारी करीत आहेत. देशांतर्गत सर्वांत महत्वाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी चषकाला खेळाडू प्राथमिकता न देता आयपीएलकडे अधिक लक्ष देत आहेत, ही बाब बीसीसीआयच्या पचनी पडलेली नाही. यामुळे भारतीय क्रिकेटच्या या शिखर संघटनेने सध्या भारत-इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळत नसलेल्या आयपीएलमधील सीनियर खेळाडूंना रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले. यामुळे कृणाल पंड्या, दीपक चहर, इशान किशन या खेळाडूंना दणका बसला आहे.

 बडोद्याचा कृणाल पंड्या आणि राजस्थानचा दीपक चहर या खेळाडूंनी राज्य संघासोबत सामने खेळण्याऐवजी आयपीएलच्या तयारीला प्राधान्य दिले आहे. राष्ट्रीय निवडकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने सर्व खेळाडूंना ईमेल केले. बोर्डाने खेळाडूंना त्यांच्या राज्य संघाकडून रणजी चषक सामन्यांची पुढील फेरी खेळण्यास बजावले आहे.

  बीसीसीआयने सोमवारी ईमेलद्वारे खेळाडूंना इशारा दिला. राष्ट्रीय संघ आणि एनसीएमध्ये नसलेल्या खेळाडूंना राज्य संघासोबत सामने खेळावे लागतील, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. रणजी ट्रॉफीची पुढील फेरी १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या फेरीत सर्व खेळाडूंना राज्य संघात सहभागी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तंदुरुस्त असूनही खेळाडू रणजी खेळायला आले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. २२ मार्च ते २६ मे या काळात आयपीएलचे १७वे पर्व रंगणार आहे. यासाठी तयाी करण्याच्या नावाखाली अनेक खेळाडूंनी रणजी स्पर्धेकडे पाठ फिरवल्याचे लक्षात आल्यानंतर बीसीसीआयने त्यांना ही तंबी दिली. यामुळे एरवी बीसीसीआयवर टीका करणाऱ्या अनेक क्रिकेटप्रेमींनी या निर्णयाबाबत संघटनेचे कौतुक केले आहे. 

 

कृणाल पंड्या, दीपक चहर, इशान किशन यांना दणका

बडोद्याचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या आणि राजस्थानचा वेगवान गोलंदाज दीपक चहर यांनी आधीच आयपीएलची तयारी सुरू केली आहे. आता त्यांना घरच्या संघासोबत रणजी सामने खेळावे लागणार आहेत.

कृणाल पंड्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्सकडून खेळतो. त्याने बडोद्यात आयपीएलची तयारी सुरू केली आहे. कृणालने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या स्पर्धा खेळल्या होत्या, पण तो प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी उपलब्ध नव्हता. दुसरीकडे चहरने कौटुंबिक कारणांमुळे डिसेंबर-जानेवारीमध्ये सुट्टी घेतली. तो आता तंदुरुस्त आहे पण अद्याप प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत नाही. दीपक चहरने डिसेंबरमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे.

 एवढेच नाही तर सिनियर संघातून बाहेर असलेला श्रेयस अय्यर आणि मानसिक विश्रांतीनंतर पुनरागमन केलेला इशान किशन यांनाही त्यांच्या राज्य संघाकडून खेळावे लागणार आहे. इशान झारखंडमधून देशांतर्गत क्रिकेट खेळतो आणि श्रेयस मुंबईकडून खेळतो.   ईशानने आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता, कारण तो बराच काळ संघात होता आणि तो आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हता. अशा स्थितीत ईशानने ब्रेकमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवला. तयारीअभावी तो रणजी ट्रॉफी खेळू शकला नसल्याचे सूत्राने सांगितले. मुंबईत होणाऱ्या डीवाय पाटील स्पर्धेत तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest