संग्रहित छायाचित्र
पॅरिस ऑलिम्पिकचे काऊंटडज्ञऊन सुरू झाले आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच जपानला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडूला सिगारेट ओढल्यामुळे मायदेशी पाठवण्यात आले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकला २६ जुलैपासून सुरूवात होत आहे. याआधी जपानच्या महिला कलात्मक जिम्नॅस्टिक संघाची १९ वर्षीय कर्णधार शोको मियाता हिने आपले नाव स्पर्धेतून मागे घेतले आहे. याबाबत जपानी जिम्नॅस्टिक असोसिएशनने (जेजीए) माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तिने धूम्रपान करून संघाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले होते. यानंतर आता तिने आपले नाव मागे घेतले.
याबाबत जेजीए अधिकाऱ्यांनी सांगितले की, मियाता चाचणीसाठी मोनाको येथील संघाच्या प्रशिक्षण शिबिरातून बाहेर पडल्यानंतर जपानला पोहोचली होती, ज्यामध्ये तिच्या मद्यपानाची पुष्टी झाली होती. जेजीएने सांगितले की, आता पाचऐवजी केवळ चार खेळाडू स्पर्धेत सहभागी होतील.
जेजीएचे अध्यक्ष तादाशी फुजिता आणि त्यांचे वैयक्तिक प्रशिक्षक मुत्सुमी हरदा आणि इतर अधिकाऱ्यांनी मियाताच्या कृत्याबद्दल चाहत्यांची माफी मागितली आहे. यावेळी जपानच्या महिला जिम्नॅस्टिक संघाकडून खूप अपेक्षा होत्या. १९६४ च्या टोकियो ऑलिम्पिकनंतर ती पहिल्यांदाच जपानसाठी पदक जिंकेल अशी अपेक्षा होती.
याबाबत प्रशिक्षक हरदा म्हणाले, ‘‘मियाता निष्काळजी होती हे खरे असले तरी तिच्यावर कामगिरीचे खूप दडपण होते. गेले काही दिवस ती खूप दडपणाखाली घालवत होती. मी लोकांना हे समजून घेण्याची विनंती करेन. मियाता ही सध्याची जपानी राष्ट्रीय चॅम्पियन आहे. यावेळी ती पदकाची दावेदार मानली जात होती. तिने २०२२ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये बीमवर कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय अष्टपैलू स्पर्धेत ती पाचव्या स्थानावर राहिली होती.’ ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी या खेळाडूंवर खूप मानसिक दडपण असते. टोकियोमध्ये गेल्या वेळी जिम्नॅस्टिक्सची सुपरस्टार सिमोन बायल्सनेही आपले नाव माघारी घेतले होते. वृत्तसंंस्था