संग्रहित छायाचित्र
दाम्बुला: गोलंदाजी तसेच फलंदाजीत केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर महिलांच्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने शुक्रवारी (दि. १९) परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ७ विकेट्स राखून मोठा विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाला भारताच्या गोलंदाजांनी १९.२ षटकांत १०८ धावांवर गुंडाळले. दीप्ती शर्माने तीन तर रेणुकासिंग, पूजा वस्त्राकार आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात, १४.१ षटकांत ३ बाद १०९ धावा फटकावत भारताने सामना जिंकला. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी ९.३ षटकांत ८५ धावांची सलामी देत भारताचा विजय निश्चित केला. स्मृतीने ४५ तर शफालीने ४० धावा केल्या. २० धावांत पाकिस्तानचे तीन महत्वाचे बळी घेणारी दीप्ती ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरली.
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ १०८ धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने १४.१ षटकात ३ बाद १०९ धावा फटकावत बाजी मारली. महिला आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान संघ आतापर्यंत सहावेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये भारताने पाचवेळा आणि पाकिस्तानने एकदा सामना जिंकला आहे.
टीम इंडियाने पाकिस्तानला १०८ धावांवर गुंडाळले. पाकिस्तान संघाकडून सिरदा अमीनने सर्वाधिक २५ धावा केल्या. तिने ३५ चेंडूंचा सामना करत 3 चौकार मारले. तुबा हसन आणि फातिमा सना यांनी प्रत्येकी २२ धावांचे योगदान दिले. भारतीय गोलंदाजांची या सामन्यात चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. वृत्तसंंस्था
स्मृती-शफाली चमकल्या
भारताच्या विजयात स्मृती-शफाली या सलामी जोडीने महत्त्वाची भूमिका बजावली. दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी झाली. भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना ३१ चेंडूत ४५ धावा करून बाद झाली. यादरम्यान तिने नऊ चौकार मारले. शफालीने २९ चेंडूंत १ षटकार आणि ६ चौकारांसह ४० धावा केल्या. या दोघी बाद झाल्यानंतर दयालन हेमलथाची (१४) विकेट भारताने गमावली. कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद ५) आणि जेमिमा रॉड्रिग्स (नाबाद ३) यांनी भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.