संग्रहित छायाचित्र
मुंबई: टी-२० क्रिकेट हा वेगवान प्रकार आहे. यात फिटनेस हा फॅक्टर महत्त्वपूर्ण असतो. हार्दिक पंड्याला सातत्याने दुखापती झाल्या आहेत. यामुळे त्याच्याकडे टी२० प्रकारातील कर्णधारपद सोपवले नाही, असे निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी सोमवारी (दि. २२) स्पष्ट केले.
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी आगरकर म्हणाले, ‘‘सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले कारण तो पात्र उमेदवारांपैकी एक आहे. तो टी२० तील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. आपल्याला सर्व सामने खेळणारा कर्णधार हवा आहे. हार्दिक पंड्याचा फिटनेस आव्हानात्मक आहे. खुद्द हार्दिकलाही याची कल्पना आहे. यामुळेच भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी त्याच्याऐवजी सूर्याच्या नावाला पसंती देण्यात आली.’’
टीम इंडियासाठी हार्दिक हा खूप महत्त्वाचा खेळाडू असल्याचे आगरकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. ‘‘फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण या तिन्ही स्तरावर हार्दिक आपले योगदान देत असतो. पण त्याचा फिटनेस हा चिंतेचा विषय आहे. त्याला प्रत्येक सामना खेळायला लावणे निवडकर्त्यांना आणि प्रशिक्षकांना अवघड जाते. आम्हाला सर्व सामने खेळण्यासाठी उपलब्ध असलेला कर्णधार हवा होता. सूर्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत. इतर कोणतेही कारण यामागे नाही,’’ असेही आगरकर यांनी सांगितले.
गंभीर आणि मुख्य निवडकर्ता आगरकर यांनी १८ जुलै रोजी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. संघाच्या घोषणेतील सर्वात मोठा निर्णय हा हार्दिकला टी-२० कर्णधारपद न देण्याचा होता. टीम इंडिया श्रीलंकेत तीन टी-२०सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर कोलंबोमध्ये २ ऑगस्टपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना पल्लेकेले येथे २७ जुलै रोजी पहिल्या टी२० लढतीद्वारे या मालिकेला प्रारंभ होणार आहे.
गौतम गंभीर नुकताच टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. भारतीय प्रशिक्षक म्हणून गंभीरची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. ४२ वर्षीय गंभीरने 'द वॉल' या नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडची जागा घेतली आहे. टी-२० विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपला. गंभीरचा कार्यकाळ जुलै २०२७ पर्यंत असेल.
...तर विराट-रोहित २०२७ चा वर्ल्डकप खेळू शकतात : गंभीर
नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने या पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गजांनी भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. गंभीर म्हणाले, ‘‘विराट आणि रोहित हे चॅम्पियन खेळाडू आहेत. जगभर त्यांचे चाहते आहेत. मला वाटते की रोहित-विराटने मोठ्या मंचावर ते काय करू शकतात हे दाखवून दिले आहे, मग तो टी-२० विश्वचषक असो किंवा एकदिवसीय विश्वचषक असो. विराट आणि रोहित यांनी टी-२०तून निवृत्तीचा निर्णय स्वत:हून घेतला आहे. आपण सर्वांनी त्याचा सन्मान करायला हवा. मात्र, या दोन्ही खेळाडूंमध्ये अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी, ऑस्ट्रेलिया मालिका आहे, मग फिटनेस चांगला असेल तर विराट आणि रोहित यांना २०२७ च्या विश्वचषकातदेखील खेळताना आपण पाहू शकू,’’ असे गंभीर एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाला.
मागील वर्षी आयपीएलमध्ये गंभीर आणि विराट यांच्यात वाद झाला होता. यामुळे त्यांचे संबंध ताणले गेले होते. आता मात्र त्यात सुधारणा झाली आहे. या संदर्भात पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तात गंभीर म्हणाला, ‘‘विराटसोबत माझे चांगले नाते आहे. आमचे संबंध टीआरपीसाठी नाहीत, हे लक्षात घ्या.. सध्या आम्ही १४० कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करत आहोत. विराट हा जागतिक दर्जाचा फलंदाज आहे. मी अनेक वेळा सांगितले आहे की, आम्ही एकत्र टीम इंडियासाठी कठोर परिश्रम करू आणि १४० कोटी देशबांधवांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी करून दाखवू.’’
जडेजाला वनडे संघातून वगळले नाही : आगरकर
आगरकर म्हणाले, ‘‘रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघातून वगळण्यात आलेले नाही, तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. तो संघाच्या रणनीतीचा एक भाग राहील. संघाबाहेर असलेल्या प्रत्येक खेळाडूला असे वाटते की आपल्यासोबत काहीतरी वाईट घडले आहे. काही वेळा असेच होते. त्याला नाईलाज असतो. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या दोघांना एकाच छोट्या मालिकेत घेणे योग्य होणार नाही. रिंकू सिंहचे उदाहरण घ्या. त्याचा काही दोष नव्हता. पण तो टी२० विश्वचषक खेळू शकला नाही. विश्वचषकापूर्वी तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता. पण कधी कधी अशा काही गोष्टी घडतात. दुर्दैवाने आम्ही १५ खेळाडूंपैकी प्रत्येकाला अंतिम संघात संधी देऊ शकत नाही, हे कृपया लक्षात घ्या.’’