संग्रहित छायाचित्र
मुंबई: भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात असून त्यातील टी-२० मधील पहिला सामना २७ जुलै रोजी तर पहिला एकदिवसीय सामना हा २ ऑगस्ट रोजी होत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा श्रीलंकेत एक दिवसीय मालिकेत खेळणार असून संघाचे नेतृत्वही करणार आहे. तसेच टी-२० संघाचे नेतृत्व सूर्याकुमार यादव याच्याकडे सोपविले आहे. याआधी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल अशी चर्चा होती. मात्र, भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी परस्परांशी सल्लामसलत करून सूर्याच्या नावाला पसंती दिली. याआधी सहा महिने सतत क्रिकेट खेळल्यामुळे रोहित श्रीलंकेतील एक दिवसीय मालिकेत खेळणार नाही असे सांगण्यात येत होते. मात्र, गंभीरच्या आग्रहानंतर रोहितने एक दिवसीय मालिकेचे नेतृत्व आणि खेळण्यास मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. तसेच विराट कोहलीही एक दिवसीय मालिकेत खेळणार आहे.
टी-२० मालिकेतील पहिला सामना २७ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता पल्लेकेले येथे खेळवला जाईल. कोलंबोमध्ये २ ऑगस्टपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गेल्या महिन्यात श्रीलंका दौऱ्यासाठी टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्याचे सूतोवाच केले होते. आता श्रीलंकेतील एक दिवसीय मालिकेसाठी विराट कोहलीनेही आपण उपलब्ध असल्याचे कळवले आहे. भारतीय संघाने नुकतीच झिम्बाब्वेविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली. यासाठी निवड समितीने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली युवा संघ पाठवला होता. टीम इंडियाने मालिका ४-१ ने जिंकली.
गौतम गंभीर २ दिवसांपूर्वी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला असून प्रशिक्षक म्हणून गंभीरची ही पहिलीच मालिका असेल. ४२ वर्षीय गंभीरने 'द वॉल' या नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडची जागा घेतली आहे. टी-२० विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपला. गंभीरचा कार्यकाळ जुलै २०२७ पर्यंत असेल.