संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : जगातील तमाम क्रीडा शौकिनांचे लक्ष लागून राहिलेल्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला २६ जुलैपासून सुरुवात होत असून त्या अगोदर एक दिवस आधी म्हणजे २५ जुलै रोजी भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला प्रारंभ होईल. भारतीय खेळाडू पुन्हा ऑलिम्पिक पदकांची कमाई करण्यासाठी सज्ज झाले असून त्यातही शौकिनांंचे लक्ष असेल ते गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या कामगिरीकडे. पॅरिसमध्ये भारताचे ११७ खेळाडूंचे पथक सहभागी होत आहे. हॉकी आणि बॅडमिंटनमध्ये भारताला खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे.
भारतीय तिरंदाज पहिल्या दिवशी मैदानात उतरणार आहेत. २७ जुलै रोजी भारताचे बॅडमिंटनपटू, बॉक्सिंग, टेबल टेनिस, नेमबाजी, नौकानयन, हॉकी आणि टेनिस संघ मैदानात उतरणार आहेत. चाहत्यांना पुन्हा एकदा नीरज चोप्रासारख्या प्रतिभावान खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा असेल. गेल्या वेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण ७ पदके जिंकली होती. यावेळी भारतीय खेळाडूंचे लक्ष्य सुवर्णपदकांची संख्या वाढविण्यावर असणार आहे. ११ ऑगस्टला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मोहिमेची सांगता होणार आहे. ११ ऑगस्ट रोजी भारतीय बॉक्सर आणि कुस्तीपटू पदकासाठी मैदानात उतरतील. आता पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे संपूर्ण वेळापत्रकही समोर आले आहे.
भारताचा हॉकी संघ आणि बॅडमिंटन खेळाडूंकडून देशाला पदकांची अपेक्षा आहे. भारताचे बॅडमिंटनचे गट सामने हे २७ तारखेपासूनच सुरू होणार आहेत. तर पदाकासाठीचे सामने ३ ऑगस्टपासून सुरू होतील. तसेच हॉकीचे सामनेही २७ जुलैपासून सुरू होणार आहेत. भारतीय संघ बेल्जियम, अर्जेंटिना, आयर्लंड, न्यूझीलंड या संघांविरुद्ध सामने खेळणार आहे. हॉकीचे पदकासाठीचे सामने ६-७ ऑगस्टला खेळवले जातील.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय जनतेला सर्व खेळाडूंकडून पदकांची आशा आहे. मात्र, या जास्त अपेक्षा २६ वर्षीय भालाफेकपटू ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा याच्याकडून आहेत. त्याचे कारण म्हणजे ऑलिम्पिक असो, कॉमनवेल्थ गेम्स असो किंवा आशियाई गेम्स, प्रत्येक वेळी त्याच्या भालाफेकने पदकाचा अचूक वेध घेतला आहे. तसेच संपूर्ण देशात भालाफेकची पातळी लक्षणीयरीत्या उंचावली. अलीकडेच, त्याने दुखापतीच्या दीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन केले आहे आणि पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
नीरज चोप्राला जवळपास प्रत्येक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची सवय झाली आहे. नीरज चोप्राने २०१६ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक मिळवायला सुरुवात केली. त्यावेळी तो अवघ्या १९ वर्षांचा होता. ज्या वयात भारतातील तरुण आपल्या करिअरचा फारसा विचार करत नाहीत, त्या वयात नीरजने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हापासून नीरज चोप्राने कधीही मागे वळून पाहिले नाही. लहान-मोठ्या स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकत राहिला आहे.
२०२१ मध्ये त्याच्या कारकिर्दीने सर्वात मोठे वळण घेतले. या वर्षी त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकले होते. या पदकाने करोडो भारतीय चाहत्यांना आशा दिली की, भारत या खेळांमध्येही चांगली कामगिरी करू शकतो. ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने आतापर्यंत जागतिक स्पर्धेत एकूण १० पदके जिंकली आहेत.
२०१६ मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण. २०१७ मध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण, २०१८ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण, २०१८ मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण, २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, २०२२ च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण, २०२२ मध्ये डायमंड लीग स्पर्धेत सुवर्ण, २०२२ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य, २०२३ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण आणि २०२३ च्या डायमंड लीग २०२३ मध्ये रौप्य अशी दहा पदकांची नोंद नीरज चोप्राच्या नावावर आहे.