संग्रहित छायाचित्र
विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा, युरो चषक फुटबाॅल स्पर्धा तसेच कोपा अमेरिका फुटबाॅल स्पर्धा आटोपल्यानंतर आता जगभरातील क्रीडाप्रेमींना वेध लागले आहेत ते खेळाचा कुंभमेळा अर्थात ऑलिम्पिकचे! यंदाचे ऑलिम्पिक पॅरिसमध्ये रंगणार असून ही स्पर्धा अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे.
पॅरिसमध्ये येत्या २६ तारखेपासून सुरु होणारे हे ३३ वे ऑलिम्पिक असेल. तीन ऑलिम्पिकचे आयोजन करणारे लंडननंतरचे ते दुसरे शहर ठरेल. यापूर्वीचे पॅरिसमध्ये १९०० आणि १९२४ मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. लंडनने १९०८, १९४८ तसेच २०१२ मध्ये या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केले होते.
यावेळच्या ऑलिम्पिकचा उद्घाटन समारंभ स्टेडियमऐवजी नदीच्या काठावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून अधिकाधिक प्रेक्षक तेथे उपस्थित राहून हा सोहळा पाहू शकतील. पॅरिसच्या मध्यभागी होणाऱ्या या सोहळ्याला तब्बल सहा लाख चाहते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यापैकी २ लाख २२ हजार मोफत तिकीटांचे वितरण करण्यात आले आहे. अधिकृत ब्रॉडकास्टरला अपेक्षा आहे की जगभरातील सुमारे दीडशे कोटी क्रीडाप्रेमी टीव्हीवर हा उद्घाटन पाहतील. २०१६ मध्ये संपूर्ण रिओ ऑलिम्पिकची प्रेक्षक संख्या ३२० कोटी होती. हा एका स्पर्धेसाठी लाभलेल्या प्रेक्षकसंख्येचा विक्रम होता. यावेळचे ऑलिम्पिक १७ दिवस चालणार असून यासाठी आयोजकांनी तब्बल एक कोटी तिकिटे जारी केली. त्यापैकी ९० लाख तिकिटे विकली गेली असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे.
या ऑलिम्पिकची मशाल रिले १६ एप्रिलपासून सुरू झाली. ग्रीसमधील ऑलिम्पियामध्ये ऑलिम्पिकची ज्योत प्रज्वलित झाल्यानंतर २६ एप्रिल रोजी ती अथेन्सला पोहोचली. त्यानंतर ९ मे रोजी मार्सेलीला पोहोचली. यानंतर मोनॅकोमध्ये काही काळ मुक्काम केल्यानंतर फ्रान्सचा दौरा सुरू झाला. २६ जुलै रोजी उद्घाटन समारंभात ती ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करेल. या दौऱ्यात १० हजार लोक मशाल धरतील. यामध्ये खेळाडू आणि सेलिब्रिटींचाही समावेश आहे.
पॅरिसच्या एका लक्झरी ज्वेलरी फर्मने या खेळांसाठी ५,०८४ पदके तयार केली आहेत. प्रत्येक पदकात आयफेल टॉवरमधील १८ ग्रॅम धातूदेखील जोडण्यात आला आहे. या पदकामध्ये ग्रीक देवी नायके, १८९६ मध्ये पहिले ऑलिम्पिक आयोजित केलेले स्टेडियम आणि आयफेल टॉवरचे चित्रण आहे. या पदकांचे वजन ४५५ ते ५२९ ग्रॅमपर्यंत आहे. ऑलिम्पिकमध्ये चार खेळ नवीन आहेत. यावेळी ब्रेकिंगचे (ब्रेक डान्सिंग) पदार्पण होणार आहे, तर स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग आणि सर्फिंग हे फक्त दुसऱ्यांदाच सामिल होणार आहेत. हे प्रकार टोकियोमध्ये प्रथमच समाविष्ट केले गेले.
भारतीय पथक ११३ खेळाडूंचे
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे ११३ खेळाडू सहभागी होणार आहेत. यात ६६ पुरुष तर ४७ महिला खेळाडूंचा समावेश आहे. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार २०२०च्या पण कोविडमुळे २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकपेक्षा यावेळचे भारतीय पथकातील खेळाडूंची संख्या सातने कमी आहे. विशेष म्हणजे, नेमबाजीच्या सर्व प्रकारांमध्ये भारतीयखेळाडू सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
तब्बल १०० वर्षांनंतर..
पॅरिसमध्ये ऑलिम्पक खेळाचे आयोजन होण्याची ही तिसरी वेळ आहे. यातही विशेष म्हणजे तब्बल १०० वर्षांनंतर या शहरात ऑलिम्पिक होत आहे. यापूर्वी १९०० आणि १९२४ मध्ये पॅरिसमध्ये ऑलिम्पिक झाले होते. यावेळच्या ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य आहे, ‘गेम्स वाइड ओपन’ म्हणजे खेळ मोठे, वेगळे आणि अधिक खुले आहेत.
एकापेक्षा जास्त वेळा ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणारी शहरे
शहर स्पर्धा
लंडन, इंग्लंड १९०८, १९४८, २०१२
पॅरिस, फ्रान्स १९००, १९२४, २०२४
लाॅस एंजेलिस, अमेरिका १९३२, १९८४
अथेन्स, ग्रीस १८९६, २००४
टोकियो, जपान १९९४, २०२०
सर्फिंग सेंटर १५,७१६ किलोमीटर दूर
हे ऑलिम्पिक पॅरिससह फ्रान्समधील इतर १६ शहरांमध्येही होणार आहे. त्यामुळे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ऑलिम्पिकही असेल. या स्पर्धेची काही ठिकाणे यजमान शहर पॅरिसपासून १० ते ७०० किलोमीटर अंतरावर आहेत. ऑलिम्पिक सर्फिंग समुद्रात आयोजित केले जाईल. ऑलिम्पिकच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे. फ्रेंच पॉलिनेशियामध्ये स्थित, ताहितीचा बीच हे एक सर्फिंग ठिकाण आहे. ते पॅरिसपासून तब्बल १५,७१६ किलोमीटर आणि १२ टाइम झोन दूर आहे. ताहितीमधील सर्फिंग हे कोणत्याही ऑलिम्पिकमधील कार्यक्रम आणि यजमान शहर यांच्यातील सर्वात लांब अंतर आहे.
‘प्लान बी’ आणि ‘सी’देखील तयार
उन्हाळी ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये न होता नदीच्या काठावर होणार आहे. सुमारे तीन तास चालणाऱ्या या सोहळ्यात तीन हजार कलाकार परफॉर्म करणार आहेत. सीन नदीच्यापरिसरात बोट परेडसह खेळांचे उद्घाटन करेल. सुमारे ११ हजार खेळाडू, प्रशिक्षक, नेते, कर्मचारी यामध्ये सामिल होतील. सुरक्षेचा विचार करता ‘प्लान बी’देखील ठरवण्यात आाल आहे. यानुसार, उद्घाटन आयफेल टॉवरसमोर होऊ शकते. तेही शक्य न झाल्यास ‘प्लान सी’नुसार उद्घाटन समारंभ सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या स्टेड डी फ्रान्समध्येदेखील हलविला जाऊ शकतो.