संग्रहित छायाचित्र
लंडन: इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटनं कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन या ‘फॅब’ फोरमधील फलंदाजांवर मोठी आघाडी घेतली आहे.
विराटसह रुट, स्मिथ आणि विल्यम्सन यांना वर्तमान क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम फलंदाज मानले जाते. या चौघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून धावा आणि शतके या बाबतीत स्पर्धा बघायला मिळते. कसोटीतील धावांचा विचार करता रुटने तिघांवर मोठी आघाडी मिळवल्याचे दिसून येते. रुटनं रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार शतक झळकावलं. यासह त्याने कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे.
३३ वर्षीय रुटने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात १२० धावा केल्या. या खेळीसह रुटने सर्वाधिक कसोटी धावांच्या बाबतीत विंडीजचा दिग्गज फलंदाज शिवनारायण चंदरपॉलला मागे टाकलं. आता त्याचं पुढील टार्गेट ब्रायन लारा आहे. लाराला मागे टाकण्यासाठी जो रुटला केवळ १४ धावांची आवश्यकता आहे. जो रुटच्या नावावर १४२ कसोटी सामन्यांमध्ये ११,९४० धावांची नोंद आहे. लाराने १३१ कसोटीत ११,९५३ धावा केल्या आहेत.
या ‘फॅब फोर’ची तुलना केली असता कसोटीत रुट इतर तीन फलंदाजांपेक्षा खूपच पुढे गेला आहे. रुट हा फॅब फोरमधील एकमेव फलंदाज आहे, ज्यानं १० हजारांहून अधिक कसोटी धावा केल्या आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं १०९ कसोटी सामन्यात ९,६८५ धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर ११३ कसोटीत ८,८४८ धावा जमा आहेत. १०० कसोटीत ८,७४३ धावांसह न्यूझीलंडचा केन विल्यमसन चौथ्या क्रमांकावर आहे.
आता विराट, स्मिथ आणि विल्यमसन यांचं पहिले लक्ष्य १० हजार धावा पूर्ण करण्याचं असेल. स्मिथ हा टप्पा लवकर गाठू शकतो. त्याचवेळी रुट आता कुमार संगकारा (१२,४०० धावा), ॲलस्टर कूक (१२,४७२ धावा) आणि राहुल द्रविड (१३,२८८ धावा) यांना मागे टाकण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या रुटचा फॉर्म पाहता तो या वर्षी संगकारा आणि कूक यांना मागे टाकू शकतो. द्रविडचा विक्रमही रुटच्या निशाण्यावर असेल. मात्र यासाठी त्याला पुढील वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.