संग्रहित छायाचित्र
क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच पुनरागमनाची इच्छा व्यक्त केली. मात्र, त्याची ही विनंती प्रोफेशनॅलिझमसाठी प्रसिद्ध असलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने धुडकावून लावली आहे.
काही दिवसांपूर्वी वॉर्नरने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही, क्रिकेट ऑस्ट्रेलियाची इच्छा असल्यास तो पाकिस्तानमध्ये एकदिवसीय चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू शकतो.’’ मात्र, २०२५ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघात डेव्हिड वॉर्नरच्या नावाचा विचार केला जाणार नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय निवडकर्ते जॉर्ज बेली म्हणाले, ‘‘डेव्हिड निवृत्त झाला आहे आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने ज्याप्रकारे कारकीर्द घडवली त्याचे कौतुक करायला हवे. तो पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑसी संघाचा भाग नसेल. आमच्या रणनीतीत तो बसत नाही. ’’
वाॅर्नर कधी विनोद करतो हे तुम्ही सांगू शकत नाही. तो एक महान खेळाडू आहे आणि त्याचा वारसा पुढेही वाढत जाईल. या संघाचा विचार करता येथे काही नवीन आणि उदयोन्मुख खेळाडू उदयास येतील. त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी वाॅर्नरची मदत घेण्याचा विचार नक्कीच होऊ शकतो. तिन्ही फॉरमॅटमधील बदलाचा हा प्रवास रोमांचक असणार आहे, अशा शब्दांत जॉर्ज बेली यांनी वॉर्नरच्या पुनरागमनाच्या शक्यतांना पूर्णविराम दिला.
वॉर्नर तीन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. यामध्ये २०१५ आणि २०२३ मधील एकदिवसीय विश्वचषक आणि २०२१ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचा समावेश आहे. वॉर्नर २०२१ च्या टी-२०विश्वचषकात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.