नामिबियाच्या जॅन निकोल लॉफ्टी इटनचे विश्वविक्रमी शतक!

इटन याने झळकावले टी-२० प्रकारांतील सर्वांत वेगवान शतक, ३३ चेंडूंत केला पराक्रम, नेपाळवर २० धावांनी विजय

 WorldRecordCentury!

नामिबियाच्या जॅन निकोल लॉफ्टी इटनचे विश्वविक्रमी शतक!

#कीर्तीपूर

नामिबियाचा डावखुरा फलंदाज जॅन निकोल लॉफ्टी इटनने नेपाळविरुद्ध अवघ्या ३३ चेंडूत शतक झळकावून विश्वविक्रम नोंदवला. त्याच्या या तडाख्यामुळे तिरंगी टी-२० मालिकेत मंगळवारी (दि. २७) नामिबियाने नेपाळवर २० धावांनी विजय मिळवला.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये मंगळवारी सर्वांत वेगवान शतकाची नोंद झाली आहे. नेपाळ टी-२० तिरंगी मालिकेत नामिबियाचा फलंदाज जॅन निकोल लॉफ्टी इटनने नेपाळविरुद्ध अवघ्या ३३ चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला. यादरम्यान त्याने तब्बल ८ षटकार आणि ११ चौकार लगावले. याबरोबरच आंतरराष्ट्रीय टी-२० प्रकारामध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विश्वविक्रम त्याने आपल्या नावे केला. त्याने नेपाळचा फलंदाज कुसल मल्लाचा विक्रम मोडला. कुसलने मागील वर्षी  मंगोलियाविरुद्ध आशियाई क्रीडा स्पर्धेत ३५ चेंडूत शतक झळकावले होते.

२२ वर्षीय इटनने या सामन्यात ३६ चेंडूत १०१ धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे नामिबियाने २० षटकांत ४ गडी गमावून २०६ धावा केल्या. विशेष म्हणजे, ३३ सामन्यांतील इटनचे हे पहिलेच शतक ठरेले. यापूर्वी त्याने अर्धशतकदेखील केले नव्हते. प्रत्युत्तरात, नेपाळचा संघ १८.५ षटकांत १८६ धावांवर बाद झाला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४० पेक्षा कमी चेंडूत शतक झळकावणारा इटन हा सातवा फलंदाज ठरला. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावून कुशल मल्लाने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज डेव्हिड मिलर, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेक प्रजासत्ताकचा सुदेश विक्रमसेकेरा यांचा विक्रम मोडीत काढला होता. या सर्वांनी ३५ चेंडूंत शतकाची वेस ओलांडली होती.

इटनने १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यानंतर पुढील ५० धावा करण्यासाठी त्याने केवळ १५ चेंडू घेतले. २०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. अइटन ११ व्या षटकात फलंदाजीला आला होता, तेव्हा नामिबियाची अवस्था ३ बाद ६२ अशी वाईट होती. खेळपट्टीवर आल्याआल्या ईटन नेपाळच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने २८०.५६ च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी केली. यादरम्यान त्याने मलान क्रुगरच्या (नाबाद ५९) साथीने त्याने चौथ्या विकेटसाठी ५२ चेंडूत १३५ धावांची वेगवान भागिदारी केली. यामुळे एकवेळ दीडशेचा टप्पा गाठणे अवघड वाटणाऱ्या नामिबियाने दोनशेपार मजल मारली.  क्रुगरने ४८ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ६ चौकार लगावले.

विजयासाठी २०७ धावांचे आव्हान नेपाळला पेलवले नाही. हा संघ ७ चेंडू बाकी असतानाच १८६ धावांवर बाद झाला. दीपेंद्र ऐरीने सर्वाधिक ४८ (३२ चेंडूंत २ षटकार, २ चौकार) तर कर्णधार रोहित पौडेलने ४२ धावांचे (२४ चेंडूंत ३ षटकार, ३ चौकार) योगदान दिले. इटनने गोलंदाजीतही चमकदार कामगिरी करताना ३ षटकांत २९ धावा देत २ बळी घेतले. बर्नार्ड शुल्ज आणि जॅन फ्रायलिंक यांनीही प्रत्येकी २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest