ज्युनिअर्सनीही केला अपेक्षाभंग...

१९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही भारत उपविजेता, सीनियर्सप्रमाणे ज्युनिअर्सचादेखील ऑस्ट्रेलिया संघाने केला पराभव

Juniorsalsodisappointed...

ज्युनिअर्सनीही केला अपेक्षाभंग...

#बेनोनी

भारताच्या सीनियर संघाप्रमाणे ज्युनिअर संघाचेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविजेतेपद पटकावण्याचे स्वप्न रविवारी (दि. ११) भंगले. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ७९ धावांनी धुव्वा उडवत विजेतेपद साकारले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ७ बाद २५३ अशी धावसंख्या उभारली. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील ही सर्वांत मोठी धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात, आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यामुळे भारतीय संघ ४३.५ षटकांत १७४ धावांवर गारद झाला. भारतातर्फे सलामीवीर आदर्शसिंग (४७) आणि आठव्या क्रमांकावरील फलंदाज मुरूगन अभिषेक (४२) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. कांगारूंतर्फे सामनावीर महली बियर्डमन आणि राफ मॅकमिलन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. भारताचे तब्बल ७ फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. यामुळे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच कांगारूंकडून पराभूत होण्याची वेळ भारतीय संघावर ओढवली.  

विजयासाठी अडीचशेच्यावर धावांचा पाठलाग करताना भारताला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. अर्शिन कुलकर्णी ३ धावांवर तंबूत परतल्यानंतर आदर्श आणि मुशीर खान यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३७ धावा जोडत भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. बियर्डमनने मुशीरला बाद  करीत ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. मुशीरने ३३ चेंडूंत २२ धावा केल्या. बियर्डमननेच त्यानंतर यास्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार उदय सहारन (८) याला बाद करून सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकवला.

महाराष्ट्राचा सचिन धस करामत करेल, अशी अपेक्षा असतानाच तोदेखील ८ चेंडूंत ९ धावा करून तंबूत परतला. एकपाठोपाठ फलंदाज बाद होत असताना सलामीवीर आदर्शने मात्र एक बाजू लावून धरली होती. अखेर ३१व्या षटकात बियर्डमननेच त्याला सातव्या गड्याच्या रुपात बाद करून ऑस्ट्रेलियाला विजयाच्या दारात आणून ठेवले. आदर्शने ७७ चेंडूंत सर्वाधिक ४७ धावा करताना १ षटकार आणि ४ चौकार लगावले. तो बाद झाला तेव्हा भारताचा ७ बाद ११५ धावा झाल्या होत्या. भारताचा डाव दीडशेच्या आत गुंडाळला जाणार असे वाटत असतानाच मुरूगन अभिषेकने भारतीयांच्या अपेक्षा जागवणारी फटकेबाजी केली. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. मुरूगनच्या ४६ चेंडूंत ४२ धावांमुळे भारताच्या पराभवाचे अंतर तेवढे कमी झाले. या खेळीदरम्यान त्याने १ षटकार आणि ५ चौकार लगावले. त्याने नमन तिवारीसह (नाबाद १४) नवव्या विकेटसाठी केलेली ४६ धावांची भागिदारी भारताच्या डावात सर्वोच्च ठरली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताला विजेतेपदासाठी २५४ धावांचे आव्हान दिले. भारतीय वंशाचा फलंदाज हरजस सिंगने सर्वाधिक ५५ धावांचे (६४ चेंडूंत ३ षटकार, ३ चौकार) योगदान दिले. कर्णधार ह्यू विबजेन ६६ चेंडूंत ५ चौकारांसह ४८ धावा करून बाद झाला. सलामीवीर हॅरी डिक्सनने ४२ धावांची (५६ चेंडूंत १ षटकार, ३ चौकार) खेळी केली. ऑलिव्हर पीक ४३ चेंडूंत एक षटकार आणि २ चौकारांसह ४६ धावा करीत नाबाद राहिला. त्याने ५०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून ऑस्ट्रेलियाला अडीचशेचा टप्पा ओलांडून दिला. भारताकडून राज लिम्बानीने १० षटकांत केवळ ३८ धावा देताना सर्वाधिक ३ बळी घेतले. नमन तिवारीला २ बळींसाठी ६३ धावांचे मोल द्यावे लागले.  मिळाले.

राज लिम्बानीने हरजस आणि हिक्स यांच्यातील चौथ्या विकेटसाठी झालेली अर्धशतकी भागीदारी मोडली. राजने ३५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यष्टिरक्षक रेयान हिक्सला (२० धावा) पायचित केले. त्यापूर्वी सलामीवीर हॅरी डिक्सन आणि कर्णधार विबजेन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी झालेली ७८ धावांची भागिदारी ऑस्ट्रेलियाच्या डावात सर्वोच्च ठरली. डावखुरा वेगवान गोलंदाज नमन तिवारीने २१व्या षटकात अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या विबजेनला मुशीर खानकरवी झेलबाद करीत ही भागिदारी संपुष्टात आणली.   पहिल्या पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली. तिसऱ्याच षटकात सॅम कॉन्स्टास यांला लिम्बानीने शून्यावर क्लीन बोल्ड केले तेव्हा कांगारूंच्या १६ धावा झाल्या होत्या. त्यानंतर डिक्सन आणि विबजेन यांनी खेळपट्टीवर स्थिरावण्याला प्राधान्य देत पहिल्या १० षटकांत ४५ धावा जोडल्या. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे नंतरच्या १० षटकांतही दोघांनी हीच सामान्य धावगती राखता आली.वृत्तसंंस्था

 

संक्षिप्त धावफलक : 

ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ७ बाद २५३ (हरजस सिंग ५५, ह्यू विबजेन ४८, ऑलिव्हर पीक नाबाद ४६, हॅरी डिक्सन ४२, रेयान हिक्स २०, राज लिम्बानी ३/३८, नमन तिवारी २/६२, सौमी पांडे १/४१, मुशीर खान १/४६) विवि भारत : ४३.५ षटकांत सर्व बाद १७४ (आदर्शसिंग ४७, मुरूगन अभिषेक ४२, मुशीर खान २२, नमन तिवारी नाबाद १४, महली बियर्डमन ३/१५ , राफ मॅकमिलन ३/४३, कॅलम विडलर २/३५).

सामनावीर : महली बियर्डमन. मालिकावीर : वेना माफका (द. आफ्रिका, २१ बळी)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest