लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल दोन टप्प्यात?

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांचे संकेत, २२ मार्चपासून स्पर्धा सुरू होण्याची शक्यता, २६ मे रोजी फायनल?

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Wed, 21 Feb 2024
  • 11:51 am
 IPLintwophasesduetoLokSabhaelections?

लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल दोन टप्प्यात?

#मुंबई

येत्या काळात देशामध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचे महत्व ध्यानात घेता यंदाची आयपीएल स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) १७वे पर्व २२ मार्चपासून सुरू होऊ शकते. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी मंगळवारी (दि. २०) ही माहिती दिली. ‘‘देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या कारणास्तव लीग दोन टप्प्यांत आयोजित केली जाऊ शकते. सर्त्त काही ठरल्याप्रमाणे घडल्यास यंदा २२ मार्च रोजी आयपीएलला सुरुवात होऊ शकते. मात्र, ऐनवेळी त्यात बदलदेखील होऊ शकतो. अंतिम फेरीची तारीख अद्याप ठरलेली नाही,’’ असेही धुमल यांनी सांगितले. दोन टप्प्यांचा कालावधी काय असेल, हे अद्याप समोर आलेले नाही.

धुमल म्हणाले, ‘‘२२ मार्च रोजी चेन्नईमध्ये या स्पर्धेतील सलामीची लढत होऊ शकते. चेन्नई सुपर किंग्ज गतविजेते आहेत आणि एमए चिदम्बरम स्टेडियमवर पहिला सामना खेळून हा संघ स्पर्धेची सुरुवात करू करेल.’’

यंदा होण्याऱ्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम लढतीची तारीख अद्याप निश्चित नसली तरी २६ मे रोजी हा सामना रंगण्याची शक्यता आहे.  कारण ही स्पर्धा संपल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे १ जूनपासून टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरु होत आहे. त्यापूर्वी ही स्पर्धा संपून काही दिवस खेळाडूंना विश्रांती मिळणे आवश्यक असेल.  

आयपीएलपूर्वीच सर्व देशांच्या क्रिकेट बोर्डांनी सांगितले आहे की त्यांचे खेळाडू अंतिम फेरीपर्यंत ही स्पर्धा खेळण्यासाठी उपलब्ध असतील. अशा परिस्थितीत उर्वरित संघातील खेळाडूंनाही एकत्रित तयारीसाठी कमी वेळ मिळेल. तथापि, प्लेऑफमध्ये न पोहोचलेल्या संघांचे खेळाडू २६ मेपूर्वी आपापल्या संघात नक्कीच सामील होऊ शकतात.

आयपीएलपूर्वी महिला प्रीमियर लीगची (डब्ल्यूपीएल) फायनलही होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १७ मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर पाच दिवसांनी आयपीएल सुरू होण्याची शक्यता आहे. डब्ल्यूपीएलचे सर्व सामने बंगळुरू आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये होणार आहेत परंतु आयपीएलमधील सर्व सामने १० संघांच्या होम ग्राउंडवर होणार आहेत. यंदा २६ मे रोजी आयपीएलची फायनल झाली तर टी-२० विश्वचषक पाच दिवसांनी सुरू होईल. मात्र टीम इंडियाचा पहिला सामना ९ दिवसांनी ५ जून रोजी होणार आहे. पण तरीही या स्पर्धेसाठी खेळाडूंना एकत्र सराव करण्यासाठी खूप कमी वेळ मिळेल.

२००९, २०१४ : निवडणुकीमुळे आयपीएल भारताबाहेर

यापूर्वी २००९ मध्ये लोकसभा निवडणूकआणि आयपीएल स्पर्धा एकाच कालावधीत झाली. देशपातळीवर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते. या कारणामुळे तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी त्यावेळी आयपीएल स्पर्धेसाठी सुरक्षाव्यवस्था पुरवण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आली. त्यात डेक्कन चार्जर्सचा संघ विजेता ठरला होता.

२०१४ मध्येदेखील पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक आणि आयपीएल यांचे वेळापत्रक एकाच वेळी आले. त्यामुळे २०१४ मध्ये या स्पर्धेतील निम्मे सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवले गेले. यात कोलकाता नाईट रायडर्स संघ विजेता ठरला होता. २०१९ मध्ये मात्र लोकसभा निवडणूक आयपीएल स्पर्धा भारतातच खेळवण्यात आली. 

आयपीएल सुरु झाले अन् भारतापासून  टी-२० विश्वविजेतेपद दुरावले...

भारतीय संघ आतापर्यंत आठवेळा टी-२०  विश्वचषक खेळला आहे. यापैकी, आयपीएल फायनलच्या २० दिवसांनी तीन वेळा स्पर्धा सुरू झाल्या. टीम इंडियाला तिन्ही वेळा ग्रुप स्टेजचा टप्पा ओलांडता आला नाही. याशिवाय संघाने उर्वरित पाचपैकी चार वेळा बाद फेरी गाठली. संघ दोनदा उपांत्य फेरीतून बाहेर पडला, एकदा उपविजेता झाला आणि एकदा चॅम्पियनही झाला.

२०१२ मध्ये, आयपीएलनंतर तीन महिन्यांनी टी-२० विश्वचषक झाला. तरीदेखील टीम इंडियाला उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवता आली नाही. भारतीय संघाने २००७ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टी-२० प्रकारातील एकमेव विजेतेपद पटकावले होते. मात्र, त्यावेळी आयपीएल सुरू झाले नव्हते. म्हणजेच, आयपीएलला सुरुवात झाल्यापासून भारतीय संघाला एकदाही टी-२० विश्वचषक जिंकता आलेला नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest