महाविजय! राजकोट कसोटीत भारताकडून इंग्लंडचा ४३४ धावांनी धुव्वा

दुसऱ्या डावात साहेबांचा संघ अवघ्या १२२ धावांत गारद; यशस्वीचे सलग दुसऱ्या सामन्यात द्विशतक, जडेजाचे पाच बळी

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Mon, 19 Feb 2024
  • 11:39 am
 Englandby434runsinRajkotTes

महाविजय! राजकोट कसोटीत भारताकडून इंग्लंडचा ४३४ धावांनी धुव्वा

राजकोट: युवा प्रतिभावान फलंदाज यशस्वी जयस्वालने मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात झळकावलेले द्विशतक तसेच डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा याने घेतलेले ५ बळी यामुळे तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने पाहुण्या इंग्लंडचा रविवारी (दि. १८) तब्बल ४३४ धावांनी धुव्वा उडवला.  

 सांघिक कामगिरीच्या जारेावर भारताने सामन्याच्या चौथ्याच दिवशी हा महाविजय साकारला. विजयासाठी ५५७ धावांच्या अवघड लक्ष्यासमोर इंग्लंडचा संघ चौथ्या डावात केवळ १२२ धावाच करू शकला. रवींद्र जडेजाने ५ विकेट घेत इंग्लंडला झटपट गुंडाळले. त्याने पहिल्या डावात शतकही केले होते. तोच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. धावांच्या फरकाने टीम इंडियाचा हा सर्वांत मोठा विजय ठरला. यापूर्वी २०२१ मध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला होता. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

तत्पूर्वी, दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जैस्वालने २१४ धावा आणि शुभमन गिलने ९१ धावा केल्या. पहिलीच कसोटी खेळत असलेल्या सर्फराझ खानने दोन्ही डावात अर्धशतके झळकावत आपला क्लास दाखवून दिला. या जोरावर भारताने आपला दुसरा डाव ९८ षटकांत ४ बाद ४३० धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात, इंग्लंडचा संघ ३९.४ षटकांत सव्वाशेच्या आत बाद झाला. जडेजाने ४१ धावांत ५ बळी घेतले. कुलदीप यादवने २ तर जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक बळी घेत त्याला चांगली साथ दिली. इंग्लंडतर्फे दहाव्या क्रमांकाचा फलंदाज मार्क वूडने सर्वाधिक ३३ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला विशीच्या पुढे जाता आले नाही. ५० धावांत पाहुण्या संघाने ७ फलंदाज गमावले होते. मात्र, टाॅम हार्टले (१६) आणि मार्क वूडच्या फलंदाजीमुळे या संघाने शतक ओलांडले.

  तत्पूर्वी काल शतकी खेळी करून पाठदुखीमुळे निवृत्त झालेल्या यशस्वीने रविवारी उत्साहात फटकेबाजी करीत या मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. त्याने २३६ चेंडूंत नाबाद २१४ धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने १२ षटकार आणि १४ चौकरांची आतषबाजी केली. शुबमन गिलचे शतक ९ धावांनी हुकले. त्याने १५१ चेंडूंत २ षटकार आणि ९ चौकारांसह ९१ धावा केल्या. पदार्पणवीर सर्फराझने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावताना नाबाद ६८ धावा फटकावल्या. त्याने ७२ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि ६ चौकार लगावले.

सामनावीर : रवींद्र जडेजा

पहिला डाव : ११२ धावा, २ बळी, दुसरा डाव : ४१ धावांत ५ बळी

संक्षिप्त धावफलक

भारत : पहिला डाव : सर्व बाद ४४५.

इंग्लंड : पहिला डाव : ७१.१ षटकांत सर्व बाद ३१९ (बेन डकेट १५३, बेन स्टोक्स ४१, ओली पोप ३९, मोहम्मद सिराज ४/८४, रवींद्र जडेजा २/५१, कुलदीप यादव २/७७, अश्विन १/३७, जसप्रीत बुमराह १/५४).

भारत : दुसरा डाव : ९८ षटकांत ४ बाद ४३० धावांवर  घोषित (यशस्वी जयस्वाल नाबाद २१४, शुबमन गिल ९१, सर्फराझ खान नाबाद ६८,  टाॅम हर्टले १/७८, जो रुट १/१११, रेहान अहमद १/१०८)

इंग्लंड : दुसरा डाव : ३९.४ षटकांत सर्व बाद १२२ (मार्क वूड ३३, रवींद्र जडेजा ५/४१, कुलदीप यादव २/१९, बुमराह १/१८, अश्विन १/१९)

सामनावीर : रवींद्र जडेजा

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest