सशक्त भारतासाठी तंदुरुस्ती गरजेची
सीविक मिरर ब्यूरो
सशक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वात आधी तंदुरुस्त शरीरसंपदेची गरज असते. शरीर तंदुरुस्त असेल, तर मन आणि मेंदू शाबूत असते. अशी तंदुरुस्त युवा पिढीच देशाला सशक्त बनवेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते, परिवहन, वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी व्यक्त केला.
पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ या अनोख्या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि. १५) जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ‘पुश इंडिया पुश’ उपक्रमाचे संस्थापक आदर्श सोमानी, मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया, एएफएमसीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल कोतवाल, नीर बहादुर गुरूंग, मुरलीकांत पेटकर, श्रीरंग इनामदार, ऑलिम्पियन गोपाळ देवांग, मनोज पिंगळे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर, राज्याचे क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, स. प. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक रणजित चामले उपस्थित होते.
‘पुश इंडिया पुश’ उपक्रमाचे संस्थापक आदर्श सोमानी म्हणाले, ‘‘देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्यातील कौशल्य क्षमता दाखविण्याची संधी मिळायला हवी. ‘पुश अप’ या व्यायाम प्रकाराचा प्रसार व्हावा, त्याचे महत्त्व वाढावे आणि बलसागर भारताचे स्वप्न साकार व्हावे हा या उपक्रमामागील आमचा उद्देश आहे.’’