संग्रहित छायाचित्र
गोवा : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या पुढील हंगामात खेळताना दिसू शकतो. चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा आयपीएल जिंकून देणार्या धोनीने आपल्याला आणखी खेळायची इच्छा असल्याचे एका कार्यक्रमात सांगितले.
४३ वर्षीय धोनी म्हणाला, ‘‘लहानपणी आम्ही दुपारी ४ वाजता बाहेर खेळायला जायचो आणि खेळाचा आनंद घ्यायचो. पण जेव्हा तुम्ही व्यावसायिक खेळ खेळत असाल, तेव्हा क्रिकेटचा खेळ म्हणून आनंद घेणे कठीण होऊन बसते. मला तेच करायचे आहे. पण ते इतकेही अवघड नाही. मला आणखी काही वर्षे या खेळाचा आनंद घ्यायचा आहे.’’
धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून आयपीएल खेळू शकतो. सीएसकेकडे त्याला चार कोटी रुपयांमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्याचा पर्याय आहे. धोनीने यंदाच्या आयपीएलपूर्वी चेन्नईचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर पुण्याच्या ऋतुराज गायकवाडकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. मात्र, ऋतुराजच्या नेतृत्वाखाली चेन्नईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही.
आणखी काही काळ खेळायची इच्छा असल्याने फिट राहण्याला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचे धोनीने स्पष्ट केले. ‘‘मला नऊ महिने स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे लागेल, जेणेकरून मी अडीच महिने आयपीएल खेळू शकेन. त्यासाठी नियोजन आवश्यक आहे, असे तो म्हणाला.