संग्रहित छायाचित्र
भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी भारताच्या लाजिरवाण्या पराभवामागे अव्वल फलंदाजांचे अपयश असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘टॉप ऑर्डरने मायदेशातील परिस्थितीत चांगली फलंदाजी करायला हवी होती. त्याच्याकडून ही अपेक्षा अनाठायी नाही. मात्र, आपले स्टार फलंदाज साफ अपयशी ठरले.’’
या सामन्यात न्यूझीलंडने ३५९ धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात भारतीय संघ २४५ धावांवर गारद झाला. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताच्या टॉप ऑर्डरच्या तीन फलंदाजांनी मिळून ६० धावा केल्या, तर दुसऱ्या डावात टॉप ऑर्डरच्या तीन फलंदाजांनी एकूण १०८ धावांची भर घातली.
“आपण सहसा घरच्या मैदानावर मालिका जिंकतो. कारण परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल असते. खेळपट्ट्या आपल्या शैलीला अनुकूल असतात आणि येथे खेळण्याची अधिक सवय आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारत वरचढ असतो. यावेळी आपले फलंदाज घरातही अपयशी ठरले. यशस्वी जयस्वालसारख्या युवा खेळाडूने आणि रवींद्र जडेजाने धावा केल्या. परंतु केवळ एक किंवा दोन फलंदाजांच्या जोरावर तुम्ही जिंकू शकत नाही. ” असे नमूद करीत मदनलाल यांनी पुण्याच्या खेळपट्टीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘‘ही खेळपट्टी भारतीय गोलंदाजांना फारशी मदत करू शकली नाही. याला आम्ही स्वतः जबाबदार आहोत. अशी खेळपट्टी बनवण्यात काही अर्थ नव्हता. अशी खेळपट्टी तयार करण्याचा कोणाचा हट्ट होता? हे मला माहीत नाही. हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय होता की अन्य कोणाचा? तुमच्याकडे एक मजबूत संघ आहे, ज्यात वेगवान आक्रमण आणि उत्कृष्ट फिरकी आक्रमण आहे. तरीही आपण या खेळपट्ट्या बनवल्या आणि स्वत:च्याच जाळ्यात अडकलो. चांगल्या खेळपट्टीवर आपण निश्चितपणे कसोटी सामना जिंकू शकलो असतो. दुसरे कारण म्हणजे आपण चांगली फलंदाजी केली नाही. आपल्या टॉप ऑर्डरने चांगली कामगिरी केली नाही. जेव्हा आमचे फलंदाज टॉप ऑर्डरमधील पाच किंवा सहा क्रमांकावर चांगली कामगिरी करतात, तेव्हा आपण कसोटी सामने जिंकतो. टॉप ऑर्डरला एक युनिट म्हणून काम करावे लागेल. कारण यशस्वी होण्यासाठी अधिक सातत्यपूर्ण कामगिरी करणे आवश्यक आहे,’’ असा सल्लाही मदनलाल यांनी दिला.