संग्रहित छायाचित्र
लखनौ : पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी मेगा लिलाव पुढील महिन्यात होणार आहे. त्यापूर्वी सर्व फ्रँचायझींना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी ३१ ऑक्टोबरपर्यंत सादर करणे अनिवार्य आहे. ही डेडलाईन संपण्यसाच्या मार्गावर असतानाच लखनौ सुपर जायन्ट्सने मोठा निर्णय जाहीर केला. त्यांनी कर्णधार केएल राहुलला रिलीज करण्याचे ठरवले आहे.
खेळाडू रिलीज करण्यासंदर्भातील मेगा लिलावापूर्वीचा हा सर्वांत मोठा निर्णय ठरला आहे. काही दिवसांपासून लखनौ फ्रँचायझी कर्णधार केएल राहुलला रिटेन करणार नाही, अशी चर्चा होती. एलएसजी केवळ तीन कॅप्ड खेळाडूंना रिटेन करणार आहे. याशिवाय दोन अनकॅप्ड खेळाडू रिटेन केले जातील. लखनौच्या कॅप्ड खेळाडूंमध्ये निकोलस पूरन, मयंक यादव आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे. तर अनकॅप्ड खेळाडू म्हणून आयुष बदोनी आणि मोहसिन खान यांची नावं समोर आली आहेत. वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज पूरन या संघाचा पहिला रिटेन्शन असेल.
युवा अष्टपैलू आयुष बदोनीनं अलीकडेच दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आपल्या तुफानी फलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलं. याशिवाय त्यानं आयपीएलमध्ये लखनौ संघासाठी अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. यामुळे त्याला चार कोटी रुपयांच्या किमतीत अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करता येईल. त्याच्याशिवाय वेगवान गोलंदाज मोहसीन खानलाही रिटेन करण्यात आल्याचं वृत्त आहे. मोहसीन अद्याप टीम इंडियाकडून खेळलेला नाही. यामुळे तो देखील अनकॅप्ड खेळाडू म्हणून चार कोटी रुपयांमध्ये रिटेन केला जाईल.
तिघांना रिटेन करण्यासाठी ५१ कोटी
निकोलस पूरन सध्या टी२० क्रिकेटमध्ये खळबळ माजवत आहे. त्याच्याकडे एकहाती सामना जिंकवण्याची क्षमता आहे. या कारणामुळे लखनौच्या संघानं त्याला राहुलऐवजी रिटेन करण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार यासाठी निकोलस पूरनला १८ कोटी रुपये मिळतील. तर मयंक यादव आणि रवी बिश्नोई यांना अनुक्रमे १४ कोटी आणि ११ कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं जाईल. अशाप्रकारे लखनौ संघाला या तिघांना रिटेन करण्यासाठी एकूण ५१ कोटी रुपये खर्च करावे लागतील.