संग्रहित छायाचित्र
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून व्हाईटवॉश टाळण्यासाठी भारतीय संघ आपली सर्व ताकद पणाला लावणार आहे. मुंबईत गेल्या १२ वर्षांपासून भारताने कसोटी गमावलेली नाही. हे पाहता तिसरी कसोटी जिंकून यजमान शेवट गोड करतील, अशी आशा आहे. (India vs New Zealand Third Test)
या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्याला १ नोव्हेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरूवात होईल. टीम इंडियाने याआधीच मालिका गमावली आहे. बंगळुरूनंतर न्यूझीलंडने पुण्यातील सामना जिंकून इतिहास रचला. भारताने १२ वर्षांनंतर घरच्या मैदानावर मालिका गमावली आहे. दुसरीकडे, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १२ वर्षांपासून भारत अजिंक्य आहे. पण हे सातत्य कायम राखण्यासाठी भारतीय संघाला फलंदाजी तसेच गोलंदाजीच्या क्षेत्रात प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघापेक्षा सरस कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.
तीन सामन्यांच्या या मालिकेत घरच्या मैदानावर व्हाईटवॉश टाळण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. तीन किंवा अधिक सामन्यांच्या मालिकेत घरच्या मैदानावर कोणताही संघ भारताचा व्हाईटवॉश करू शकलेला नाही. दक्षिण आफ्रिकेने १९९९-२००० मध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली होती. त्यावेळी मुंबईत झालेली पहिली कसोटीदेखील पाहुण्या आफ्रिकेनेच जिंकली होती. आता हा विक्रम आणखी 12 वर्षे कायम राखण्याचे आव्हान भारतासमोर आहे. मुंबईत टीम इंडियाची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे आणि आता रोहित शर्माची सेना कशी कमबॅक करते हे पाहायचे आहे.
मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर कसोटीमध्ये भारताने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाने १९७५ पासून येथे २६ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी १२ सामने जिंकले आहेत, तर सात सामने गमावले असून सात अनिर्णित राहिले आहेत. टीम इंडियाला येथे गेल्या पाच सामन्यांमध्ये फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला आहे. यामध्ये शेवटचा पराभव २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध झाला होता. त्यानंतर १२ वर्षांपासून भारत येथे अजिंक्य आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखेडे स्टेडियमवर शेवटची कसोटी डिसेंबर २०२१ मध्ये खेळली गेली होती. यामध्ये किवी संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने एका डावात सर्व १० विकेट्स घेतल्या. एका डावात १० बळी घेणारा एजाज हा न्यूझीलंडचा पहिला आणि इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला. मात्र त्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीच्या क्षेत्रात शानदार कामगिरी करीत भारताने ३७२ धावांनी मोठा विजय नोंदवला होता.
वानखेडे स्टेडियमवर भारताची कामगिरी
सामने - २६
विजय - १२
पराभव - ७
अनिर्णित - ७