संग्रहित छायाचित्र
लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला श्रेणी ‘अ’मधून श्रेणी ‘ब’ श्रेणीमध्ये ढकलले आहे.
पीसीबीने रविवारी (दि. २७) नवीन केंद्रीय करारासाठी २५ खेळाडूंची यादी जाहीर केली. त्याचबरोबर फखर जमान, इफ्तिखार अहमद आणि ओसामा मीर यांना २०२४-२५ हंगामासाठी केंद्रीय करारामध्ये ठेवण्यात आलेले नाही. गतवर्षीप्रमाणेच पीसीबीने खेळाडूंची कामगिरी, फिटनेस आणि वर्तनाचे विश्लेषण करून सुमारे तीन महिन्यांच्या विलंबानंतर करार जाहीर केले. हा करार जुलै २०२४ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत असेल.
बोर्डाने माजी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोनच खेळाडूंना ‘अ’ श्रेणी करार दिला आहे. ‘ब’ श्रेणीत शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि शान मसूद यांचा समावेश आहे. याशिवाय ‘क’ श्रेणीमध्ये ९ तर ‘ड’ मध्ये ११ खेळाडू आहेत.
पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज फखर जमान याला करारात स्थान देण्यात आलेले नाही. आठ वर्षांत पहिल्यांदाच त्याला करारात ठेवण्यात आलेले नाही. गेल्या केंद्रीय करारापर्यंत त्याचा ‘ब’ श्रेणीत समावेश होता, मात्र यावेळी त्याला थेट वगळण्यात आले आहे. यासोबतच झमानचा ऑस्ट्रेलिया दौरा तसेच झिम्बाब्वे दौऱ्यासाठीही संघात समावेश करण्यात आलेला नाही.
पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार शान मसूदला ‘ड’ वरून ‘ब’ श्रेणीत बढती देण्याता आली आहे. यामध्ये नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्या नावाचाही समावेश आहे.
पाच युवा खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी पाहता त्यांना प्रथमच केंद्रीय करार देण्यात आला. त्यात खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद इरफान खान आणि उस्मान खान यांचा समावेश आहे. या पाचही खेळाडूंना एका वर्षासाठी केंद्रीय करार देण्यात आला आहे.